अखेर योगी नमले...राहुल, प्रियंका यांना हाथरसला जाण्यास परवानगी

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात गदारोळ उडाला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती या प्रकरणामुळे प्रकर्षाने समोर आली आहे.
congress leaders rahul gandhi and priyanka gandhi allowed to go to hathras
congress leaders rahul gandhi and priyanka gandhi allowed to go to hathras

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखण्यात आले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पुन्हा हाथरसकडे रवाना झाले आहेत. हे दोघे एकाच मोटारीतून रवाना झाले असून, प्रियंका या स्वत: मोटार चालवत आहेत. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार नमले असून, दिल्ली-नोएडा फ्लायवेवरुन या दोघांना हाथरसकडे जाण्याची परवानगी दिली आहे. या वेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली होती. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अडवून पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले होते.

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. 

राहुल गांधी यांनी आज पुन्हा हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्धार केला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघे एकाच मोटारीतून हाथरसच्या दिशेने निघाले आहेत. ही मोटार प्रियंका गांधीच चालवत आहेत. या वेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी आज आम्हाला अडवले तर पुन्हा आम्ही जाण्याचा प्रयत्न करु, असा निर्धार व्यक्त केला. 

दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी काँग्रेसचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले होते. राहुल आणि प्रियंका यांचे येथे आगमन होताच कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. राहुल गांधी यांनी काही काळ कार्यकर्त्यांशी संवादही साधला. अखेर योगी सरकारने राहुल आणि प्रियंका यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. पीडितेच्या कुटुंबीयांना केवळ पाच व्यक्तींनाच भेटण्याची अट सरकारने घातली आहे. यानंतर राहुल आणि प्रियंका हाथरसकडे रवाना झाले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com