काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांविरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला - congress leader siddharamiah will meet rahul gandhi today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांविरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जुलै 2021

कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद दररोज चव्हाट्यावर येत आहेत. आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. 

बंगळूर :  कर्नाटकात (Karnataka) सत्ताधारी भाजपमधील (BJP) अंतर्गत वाद दररोज चव्हाट्यावर येत आहेत. आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील (Congress) मतभेदही समोर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यात वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांना थेट राहुल गांधींच्या भेटीला दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. 

भाजपमध्ये मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरू असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही याची सुरवात झाली आहे. राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित झाला आहे. यावरून कॉंग्रेस आमदारांमध्ये वाद सुरू झाला असून, दोन गट पडले आहेत. 

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील वादाची पक्षाच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. सिद्धरामय्या यांना पक्ष नेतृत्वाने तातडीने दिल्लीत पाचारण केले आहे. सिद्धरामय्या हे दिल्लीत दाखल झाले असून, ते पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांची 4 वाजता भेट होणार आहे. 

याबद्दल बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, राहुल गांधींनी आज सायंकाळी 4 वाजता मला भेटायला बोलावले आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. मला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी निरोप दिला होता. ही भेट कोणत्या कारणासाठी आहे याबद्दल मला तरी अद्यपा माहिती नाही. मी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीचीही मागणी केली आहे. परंतु, याबद्दल पक्षाकडून मला कळवण्यात आलेले नाही. त्यांनी वेळ दिल्यास मी त्यांना भेटेन. 

हेही वाचा : पेट्रोल, डिझेलवरील करातून मोदी सरकार मालामाल 

सिध्दरामय्या  आणि शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अस्वस्थ झाले होते. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सुरजेवाला यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पक्षाचे आमदार आणि नेत्यांना ताकीद दिली होती.

सुरजेवाला यांनी जमीर अहमद खान आणि राघवेंद्र इटनाळ यांना सिद्धरामय्या हे पुढचे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर वक्तव्य केल्याबद्दल इशारा दिला होता. सुरजेवाला यांनी म्हटले होते की, कर्नाटकात काँग्रेस नेतृत्वावरून काही लोक जाहीर वक्तव्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जेव्हा पक्षाला संधी मिळते, तेव्हा पक्षाची हाय कमांड व आमदार नेतृत्त्वाबाबत निर्णय घेतील. नेतृत्वाबाबत आतापासूनच कुणीही कोणत्याही प्रकारचे विधान करू नयेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख