मुख्यमंत्री विरुद्ध मंत्री संघर्ष पेटला अन् काँग्रेसची राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीसाठी धाव - congress leader siddaramaih demands president rule in karnataka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मुख्यमंत्री विरुद्ध मंत्री संघर्ष पेटला अन् काँग्रेसची राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीसाठी धाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 एप्रिल 2021

थेट सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी काँग्रेसने राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.  
 

बंगळूर : मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकातील भाजप सरकार आता संकटात सापडले आहे. थेट सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एवढ्यावरच न थांबता या मंत्र्यांने मुख्यमंत्र्यांची थेट राज्यपालांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी आक्रमक झालेल्या काँग्रेसनेही राज्यपालांकडे धाव घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आता सगळ्यांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे.  

मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे, असा गंभीर आरोप पंचायत राज मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि कर्नाटकचे प्रभारी व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांना पाठवली आहे. 

ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे की, प्रशासनात व्यवस्थितपणा आणि नियमितपणा येण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. मुख्यमंत्री हे वारंवार माझ्या मंत्रालयात हस्तक्षेप करीत आहेत. कर्नाटक मंत्रिमंडळ सत्ता विभाजन नियमाचे उल्लंघन करुन मुख्यमंत्री माझ्या कामकाजात ढवळाढवळ करीत आहेत. 

या प्रकरणी काँग्रेसने राज्यपालांकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर ईश्वरप्पा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपालांनी यात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही आणि गैरव्यवहार सुरू असून, याचे पुरावेच ईश्वरप्पा यांनी दिले आहेत. या बाबी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास पुरेशा आहेत. 

ईश्वरप्पा यांच्या तक्रारीनंतर सरकारमधील मुख्यमंत्र्यांविरोधातील असंतोषाला तोंड फुटले आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक मंत्री आणि आमदारांची नाराजी आहे. येडियुरप्पा आणि ईश्वरप्पा हे दोघेही शिवमोगा जिल्ह्यातील आहेत. दोघांमध्ये याआधी अनेकवेळा भांडणे आणि समझोता होण्याचे प्रकार घडले आहेत. येडियुरप्पा पहिल्यांदा २००८ मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळी ईश्वरप्पा यांचा त्यांना उघड विरोध होता. 

जारकीहोळी प्रकरणात सरकारची कोंडी 
दरम्यान, जारकीहोळी यांच्या प्रकरणामुळेही कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर संकट निर्माण झाले आहे. विरोधकांकडून सरकारवरची कोंडी केली जात आहे. त्यातच संबंधित तरूणीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. ''ते मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू शकतात. मी जारकीहोळी यांच्याकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे'', असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. या तरुणीने जारकीहोळी यांच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्यामुळे संरक्षण मिळावे, अशी मागणीही उच्च न्यायालयाकडे केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख