बांगलादेश दौऱ्यातील मोदींच्या भाषणावर थरूर यांची आधी टीका अन् नंतर 'सॉरी'! - congress leader shashi tharoor apologises to narendra modi speech in bangladesh | Politics Marathi News - Sarkarnama

बांगलादेश दौऱ्यातील मोदींच्या भाषणावर थरूर यांची आधी टीका अन् नंतर 'सॉरी'!

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. 

नवी दिल्ली : बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना बांगलादेश मुक्तीसंग्रामाबाबत केलेल्या भाषणावर काँग्रेस नेते शशि थरुर यांनी जोरदार टीका केली होती. अखेर थरुर यांनी या प्रकरणी सपशेल माघार घेत मोदींची जाहीर माफी मागितली आहे. अपूर्ण माहितीच्या आधारावर मी टीका केली होती आणि ती कबूल करण्यात मला कमीपणा वाटत नाही, असा कबुलीजबाब थरूर यांनी दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र हे बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींनी काल (ता.26) मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामाबाबत भाषण केले होते. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात दिलेल्या योगदानाबद्दल मोदींना त्यांच्या भाषणात उल्लेख केला नाही, अशी टीका थरुर यांनी केली होती. यावर आता त्यांनी मोदींची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी माध्यमांतील बातम्यांच्या आधारे टीका केली होती. माझी चूक झाली हे कबूल करण्यात काहीही चुकीचे नाही. बांगलादेशला कुणी स्वतंत्र केले हे सर्वांना माहीत आहे, असे मी काल म्हटले होते. मोदींनी इंदिरा गांधींचा उल्लेख केला नाही, असेही मी म्हटले होते. परंतु, त्यांनी प्रत्यक्षात इंदिरा गांधींचा उल्लेख केला होता. त्यामुळेच सॉरी! 

हेही वाचा : बांगलादेशात मोदींचे पाऊल पडताच लोक उतरले रस्त्यावर...चार जणांनी गमावले प्राण 

मोदींनी काल (ता.26) भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. ते म्हणाले की, आजचा दिवस हा वंगबंधूंचे आदर्श आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दूरदृष्टीवर वाटचाल करण्याचा आहे. मुक्तियोद्ध्यांच्या भावनांचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. बांगलादेशच्या मुक्तीलढ्याला भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या लढ्यातील इंदिरा गांधींचे योगदान सर्वांनाच माहिती आहे. खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी या मुक्तीलढ्यातील क्रांतिकारकांचे कौतुक केले होते. माझ्या आयुष्यात बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. विशीमध्ये असतानाच मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन केले होते. त्यावेळी मी बांगलादेशसाठी तुरुंगवासही भोगला होता. 

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोदींनी बांगलादेशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते म्हणाले होते की, भारत आणि बांगलादेश यांच्या मैत्रीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होतील. वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष दोन्ही देशांमधील संबंधांना आणखी बळकट करण्यास हातभाग लावेल. वंगबंधूंनी सामान्यांसाठी मोठा त्याग केला. त्यांना गांधी शांती सन्मान देता आला ही भारतीयांसाठीही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख