सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपसिंहने कोणाला ब्रिफिंग केले? - सचिन सावंत यांचा सवाल - Congress Leader Sachin Sawant questions relations between Sandipsinh and BJP | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपसिंहने कोणाला ब्रिफिंग केले? - सचिन सावंत यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

१४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपा च्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे म्हणत संदीपसिंह आणि भाजपा यांच्यातला 'ये रिश्ता क्या कहलाता है'? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.   

मुंबई : सुशांतसिंग राजूपत प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपीक बनवणाऱ्या संदीपसिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदिपसिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे. तसेच १४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपा च्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे म्हणत संदीपसिंह आणि भाजपा यांच्यातला 'ये रिश्ता क्या कहलाता है'? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.   

सावंत पुढे म्हणाले, ''संदिपसिंहच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता त्याच्या कंपनीला २०१७ मध्ये ६६ लाखांचे नुकसान झाले होते, २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा तर पुन्हा २०१९ मध्ये ४ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसते. अशा तोट्यातील कंपनीबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार कसा काय केला? ही कंपनी पैसे कोठून आणणार होती? मोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीपसिंहवर भाजपा एवढा मेहरबान का झाला?'' या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत.

संदिपसिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते याचीही स्पष्टता अजून होत नाही. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत अशा व्यक्तीची शहानिशा न करताच त्याच्या कंपनीशी करार कसा काय केला हेही आश्चर्यकारक आहे. हे सर्व पाहता सखोल चौकशी केल्यास यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी स्पष्ट होतील, असे सावंत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख