पायलट म्हणतात, कोण सरकारमध्ये..कोण पक्षात..हे पक्षच ठरवेल - congress leader sachin pilot said party will decide who will be in the government | Politics Marathi News - Sarkarnama

पायलट म्हणतात, कोण सरकारमध्ये..कोण पक्षात..हे पक्षच ठरवेल

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांचे बंड आता शमले आहे. मात्र, पायलट आणि त्यांच्या समर्थकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमले आहे. पक्षाने पायलट यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पायलट आणि त्यांच्या समर्थक 18 आमदारांच्या पुढील राजकीय भवितव्याबाबत मात्र, पक्ष नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावर पायलट यांनी अखेर पक्षाला सूचक इशारा दिला आहे. पायलट यांनी समर्थकांसाठी पाच मंत्रिपदे मागितल्याची चर्चा सुरू आहे.

पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पायलट यांनी पक्षाकडे काही मागण्या केल्या होत्या. यात राजस्थानमध्ये प्रभारी नेमलेल्या महाराष्ट्रातील अविनाश पांडे यांना हटवावे, अशी मागणीही होती. राजस्थानमधील काँग्रेस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून, सरकार स्थिर झाले आहे. यामुळे पक्षाने पायलट यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

काँग्रेसने पायलट यांनी पक्ष संघटनेबद्दल केलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी समिती नेमली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या या समितीत अहमद पटेल, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल आणि अजय माकन यांचा समावेश आहे. अविनाश पांडे यांना प्रभारी पदावरुन पक्षाने तातडीने हटविले आहे. त्याजागी अजय माकन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदासह दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशा पाच पदांची मागणी त्यांच्या समर्थकांसाठी केली आहे, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पायलट म्हणाले की, सरकारमध्ये कोणाला स्थान आणि पक्षात कोणाला स्थान द्यायचे याचा निर्णय पक्षच घेईल. पक्षाने तीनसदस्यीय समिती स्थापन केली असून, ती लवकरच सर्व समस्या सोडवेल, अशी आशा मला आहे. समिती स्थापन केल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्षांचे आभार मानतो. ही समिती आमचे म्हणणे ऐकून घेईल. ही समिती सांगेल त्यानुसार आम्ही काम करु. 

राजस्थानच्या प्रभारीपदाची जबाबदारी आता अजय माकन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पायलट यांनी 17 ऑगस्टला दिल्लीत  माकन यांची भेट घेतली. पायलट हे पुन्हा राज्यात परतले असून, ते त्यांच्या टोंक मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख