अर्धी लढाई संपल्यानंतर राहुल गांधी उतरले मैदानात अन् म्हणाले...

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अखेर पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत.
congress leader rahul gandhi starts west bengal assembly election campaign
congress leader rahul gandhi starts west bengal assembly election campaign

सिलिगुडी : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अखेर पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी बंगालमध्ये पोचले आहेत. राज्यात आठ टप्प्यात मतदान होत असून, अर्धी निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.   

राहुल गांधी म्हणाले की, बंगालमध्ये भाजपच्या विचारधारेचा प्रवेश होईल, त्यादिवशी बंगालमधील संस्कृती नष्ट व्हायला सुरुवात होईल. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी जेथे जातात तेथे विद्वेष पसरविणे सुरू होते. बंधुत्व, एकात्मता याबाबत ते काही बोलू शकत नाहीत. नागरिकांना एकमेकांशी भांडायला लावणे हेच त्यांचे काम असून, हाच त्यांचा डीएनए आहे. भाजप जिथे जातो त्या ठिकाणी विद्वेषाची बीजे पेरतो. सात-आठ वर्षांपूर्वीचा आणि आताचा आपला देश पाहा. तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. 

कोरोनाचा संसर्ग वर्षभरापूर्वी देशात सुरू झाला त्यावेळी मी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला धोक्याचा इशारा दिला होता. मोठे संकट येणार असून, त्याला तोंड देण्याची तयारी करा, असे आम्ही सांगितले होते. परंतु त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी आमची चेष्टा केली. आताची परिस्थिती सर्वजण पाहत आहेत, असे राहुल गांधींनी सांगितले.  

देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी काही कृती करण्याऐवजी लोकांना टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, मोबाईलचे टॉर्च लावा अशा गोष्टी करा कोरोना पळून जाईल, असे सांगितले. सध्याची उत्तर प्रदेशची विदारक स्थिती पाहा. मृतदेहांचा खच तिथे पडला आहे. मृतदेह ठेवण्यासाठी जागा पुरत नाही. परंतु, याबाबत नरेंद्र मोदी काही बोलले? देशभरातील स्थिती गंभीर असूनही काहीच कृती केली जात नाही, असे राहुल गांधी म्हणाले.  

देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आली असून, रोजगार नष्ट झाले आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. नरेंद्र मोदी यांचे केवळ दोन-तीन मित्र देशाला चालवत नाहीत तर छोटे दुकानदार, व्यावसायिक, गरीब, मजूर, शेतकरी असे सर्वजण देश चालवितात. काँग्रेसने या सर्व घटकांची काळजी घेतली आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांत आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. 

राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. लोकांना नोकऱ्या दिल्याचे ममता म्हणतात पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक विचारधारा आहे. काँग्रेसही एक विचारधारा आहे. हा विचारधारांचा संघर्ष असून, त्यांच्या विचारधारेने आमचे सर्वांत मोठे नेते महात्मा गांधी यांची हत्या केली. भाजप-संघासोबत काँग्रेस कधीही हातमिळवणी करू शकत नाही. 
- राहुल गांधी, काँग्रेस नेते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com