पंतप्रधान मोदींना कोरोनातलं काहीच कळत नाही अन् त्यांच्यामुळेच दुसरी लाट आलीय! - congress leader rahul gandhi slams narendra modi for covid second wave | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींना कोरोनातलं काहीच कळत नाही अन् त्यांच्यामुळेच दुसरी लाट आलीय!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 मे 2021

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची लाट आली असून, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला. पंतप्रधानांना कोरोनातले काहीच कळत नाही आणि त्यांच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. 

देशातील कोरोना संकटाला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका होत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांतून सरकारच्या अपयशाचे दररोज वाभाडे काढले जात आहेत. यात आज  राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरले. कोरोनातले मोदींना काहीच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

राहुल गांधी म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी कुणालाच काही माहिती नव्हते. परंतु, त्यानंतर आलेली दुसरी लाट ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. त्यांचे स्टंट आणि खोटारडेपणामुळे हे कोरोना मृत्यू सुरू आहेत. पंतप्रधान हे इव्हेंट मॅनजेर आहेत. आपल्याला इव्हेंट नको आहेत. आपल्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी रणनीती हवी आहे. 

तुम्ही आधी दरवाजा खुला ठेवला आणि आताही तो पूर्णपणे बंद केलेला नाही. देशातील केवळ 3 टक्के लोकसंख्येला तुम्ही कोरोना लस दिली आहे. उरलेल्या जनतेला कोरोनाचा धोका कायम आहे. अमेरिकेने निम्म्या लोकसंख्येला लस दिली. ब्राझीलने 9 टक्के लोकसंख्येला लस दिली. ते व्हॅक्सिन कॅपिटल नाहीत तर आपण आहोत. आपण लस उत्पादक आहोत. मी पंतप्रधानांना थेटपणे सांगतो की त्यांनी लसीकरण धोरणात सुरळीतपणा आणला नाही तर कित्येक लाटा येत राहतील, असा इशाराही राहुल गांधींनी दिला. 

कोरोना आणि लॉकडाउनवर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे केवळ तात्पुरते उपाय आहेत. योग्य लसीकरण धोरण न आखल्यास भारताला अनेक लाटांना सामोरे जावे लागेल. या वेगाने लसीकरण सुरू राहिल्यास तिसरी आणि चौथी लाटही येईल. कारण विषाणू म्युटेट होत आहे. आपण कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत. परंतु, हे विषाणू सोडून सरकार विरोधकांशी लढत आहे, असे राहुल गांधींनी सांगितले. 

हेही वाचा : भारतात सरकारी आकड्यांच्या पाचपट अधिक कोरोना मृत्यू; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा  

ट्या गोष्टी पसरवण्याची ही वेळ नाही. सरकारने खरेपणा टिकवायला हवा. हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. लोकांचे जीव आपल्याला वाचवायचे आहेत. आम्ही सरकारचे शत्रू नसून, केवळ मार्ग दाखवत आहोत. सरकारने विरोधकांचे आधीच ऐकले असते हे संकट ओढवले नसते, असे राहुल गांधींनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख