काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करणार का? आज होणार फैसला - congress leader rahul gandhi may be accept leader of oppostion post | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करणार का? आज होणार फैसला

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जुलै 2021

काँग्रेसमध्ये बदलाचे जोरदार वारे सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये (Congress) बदलाचे जोरदार वारे सुरू झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LOP) अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना पदावरुन हटवण्यात येणार आहे. हे पद राहुल गांधी स्वीकारण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदीय रणनीती गटाची बैठक आज बोलावली आहे. यात अंतिम निर्णय होणार आहे. 

पुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांच्या जागी कुणाला नेमायचे यासाठी आज काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाची बैठक सोनिया गांधींनी बोलावली आहे. या बैठकीत चौधरी यांच्या जागी नव्या नेत्याची निवड होणार आहे. राहुल यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर विरोधकही काँग्रेसला लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे राहुल हे पद स्वीकारण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राहुल गांधींनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास यासाठी शशी थरुर आणि मनीष तिवारी यांची नावे आघाडीवर आहेत. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये शशी थरुर आणि मनीष तिवारी यांचा समावेश होता. याचबरोबर गौरव गोगोई, रवनीतसिंग बिट्टू आणि उत्तमकुमार रेड्डी यांच्याही नावाची चर्चा आहे. येत्या 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नवीन पक्षनेत्याची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पावसाळी अधिवेशनाआधी अधीररंजन चौधरी यांनी पदावरुन हटवले जाणार आहे. चौधरी यांना पदावरुन हटवावे यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पक्षाने आता एक व्यक्ती एक पद असा नियम अनुसरण्यास सुरवात केली आहे. चौधरी यांच्याकडे बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांना एका पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधीररंजन हे पश्चिम बंगालमधील खासदार आहेत. तसेच ते बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षावर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली असल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागील वर्षी पत्र लिहिले होते. यानंतर पक्षात बदलाचे वारे सुरू झाले आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : कोरोना लस देण्याच्या बहाण्याने अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी 

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय समोर आणला आहे. पक्षातील नेतृत्वाची पोकळी दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यासह संघटनात्मक पातळीवर फेररचना करण्यात येणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख