काँग्रेसच्या कार्यकारी समितीचा कायमस्वरुपी सदस्य असूनही मला बैठकीला बोलावले नाही...

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली. त्यावरुन उठलेला वादंग मात्र, अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
congress leader p c chacko said he was not invited to cwc meeting
congress leader p c chacko said he was not invited to cwc meeting

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. बैठकीतील इतर विषयांपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. राहुल गांधी असे काही बोललेच नसल्याचा खुलासा पक्षाने केला आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आता सोनिया गांधी याच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बैठक संपून गेल्यानंतरही यावरुन वादंग सुरूच असून, आणखी एका ज्येष्ठ नेत्याने आता उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक सोमवारी झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती काँग्रेस नेते के.एच. मुनियप्पा यांनी दिली होती. ते म्हणाले होते की. पक्षाच्या नेृत्वत्वाच्या मुद्द्यावरुन कोणतेही मतभेद नाहीत. गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि आनंद शर्मा यांनी नेतृत्वाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे लेखी दिले आहे. सर्व सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. कार्यकारी समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. 

सोनिया यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी विनंती राहुल गांधी यांनीही केली होती. अखेर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून राहण्यास संमती दर्शविली आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष असतील. पुढील सहा महिन्यांत पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड होईल. यासाठी पुढील बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असे कार्यकारी समितीचे सदस्य पी.एल. पुनिया यांनी सांगितले होते.

आता यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांनी पक्षाला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी कार्यकारी समितीचा कायमस्वरूपी सदस्य आहे. असे असूनही मला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही. मी याबाबत सोनिया गांधी यांना संदेश पाठविला आहे. मी नेतृत्वाला पत्र लिहिण्याविरोधात नाही. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी पत्र पाठविणे आणि ते बैठकीआधी माध्यमांना जाहीर करणे टाळायला हवे होते. हे सर्व नेते दिल्लीतच होते. त्यांना पक्षाच्या नेतृत्वाला कॉल करता आला असता. मला बोलावले असते तरी मी पक्षाला यावर तोडगा सुचवला असता. 

गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि अहमद पटेल यांचीही पत्रावर स्वाक्षरी आहे. पटेल हे तर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आहेत. यात खूपच गुंतागुंत निर्माण झाली असून, पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. याचबरोबर सोनिया आणि राहुल गांधी यांनाही दु:ख पोचत आहे, असे चाको यांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com