काँग्रेस स्वबळावरच! नाना पटोलेंना थेट राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल - congress leader nana patole meets rahul gandhi in delhi-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

काँग्रेस स्वबळावरच! नाना पटोलेंना थेट राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी आज दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. स्वबळाला राहुल गांधींनी मंजुरी दिली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा, अशा पटोलेंच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीनाट्य दिसून येत आहे. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी पुढाकार घेतला होता.  पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पाटील यांनी पवारांची भेट घेतली त्यावेळी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. परंतु, पटोले हे उपस्थित नव्हते. 

पक्षाचे प्रभारी पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि पवारांशी चर्चा केल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या हाय कमांडकडे सादर केला आहे. यानंतर हाय कमांडने आज नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. पटोले यांच्याकडे राज्यातील सरकारमधील मतभेदांबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. पटोले यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राहुल गांधींशी झालेल्या भेटीत पटोले यांनी राज्यात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगितले. पटोलेंनी राज्यातील काँग्रेसच्या आगामी भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्याशी सर्व चर्चा केली. त्यांनी स्वबळाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या दृष्टीने काँग्रेस स्बवळावर लढण्याची तयारी करत असल्याचे पटोलेंनी गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : काँग्रेसच्या शेख, पाडवींना डच्चू तर शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा भरणार? 

पटोले यांच्यासह राज्यातील इतर काँग्रेस नेतेही दिल्लीत दाखल झालेत. अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर हे मंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे नेतेही काँग्रेस हाय कमांडची भेट घेऊन राज्यातील घडामोडींचा तपशील मांडणार आहेत. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांना हाय कमांडने बोलावून घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख