जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी माझीच होती; खर्गे यांचा खुलासा

काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले असून, अनेक ज्येष्ठांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश आहे.
Congress leader Mallikarjun Kharge welcomes CWC reshuffle
Congress leader Mallikarjun Kharge welcomes CWC reshuffle

बंगळूर : काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी एच. के. पाटील या कर्नाटकातील दुसऱ्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर खर्गे यांनी सरचिटणीसपदाच्या जबाबदीतून मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, खर्गे यांनी पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पक्षाने मला हटविले नसून मीच जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, असा दावाही खर्गे यांनी केला आहे.

काँग्रेस कार्यकारिणीमध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. मात्र, कार्यकारिणीत स्थान मिळण्याची चर्चा असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र नव्या फेररचनेतही संधी मिळू शकली नाही. काँग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्याकडे दिली आहे. 

काँग्रेसने संघटनात्मक बदल काल जाहीर केले. सोनिया गांधी या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आली आहे. नव्या बदलांमध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत. 

याबाबत खर्गे यांनी म्हटले आहे की, सरचिटणीसपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाला आधीच केली होती. आता पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी समाधानी आहे. मी त्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो आणि माझ्यावर सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. यातून मुक्त करण्याची मागणी मी पक्षाला केली होती. 

महाराष्ट्राच्या प्रभारीपदी एच.के. पाटील यांची निवड योग्य आहे, ते तरुण आहेत आणि विधान परिषदेचे ते आमदार, विधानसभा आमदार आणि मंत्रीही होते. त्यांना पक्ष संघटनेचा अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्राचीही व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चितच पक्षाला फायद्याची ठरेल. मी त्यांना सहकार्य करेन आणि विचारल्यास माझा सल्लाही देईन, असे खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. 

गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, खर्गे, मोतीलाल व्होरा यांना सरचिटणीस म्हणून दूर करण्यात आले आहे. मात्र, व्होरा वगळता अन्य तिघांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक या असंतुष्ट 23 मधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देणे महत्त्वपूर्ण आहे. पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये परतलेले तारिक अन्वर यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांना कायम निमंत्रित म्हणून ठेवण्यात आले आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे असलेली सरचिटणीस कार्यालय प्रशासनाची जबाबदारी पवनकुमार बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

अखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत सोनिया गांधी यांनी दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आला आहे. 

काही राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून, त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली. हरियानाच्या जबाबदारीतून गुलाम नबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून, विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्‍ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com