प्रदेशाध्यक्षांविरोधात काँग्रेसच्या नेत्याचे बंड; पोटनिवडणुकीत करणार भाजप उमेदवाराचा प्रचार

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात नेत्याने उघड बंड पुकारले असून, पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची घोषणा केली आहे.
congress leader lakhan jarkiholi targets state president d k shivakumar
congress leader lakhan jarkiholi targets state president d k shivakumar

बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्याविरोधात पक्षातील नेते लखन जारकीहोळी यांनी उघड बंड केले आहे. त्यांनी शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जारकीहोळी यांची काही ज्येष्ठ भाजप नेत्यांनी भेट घेतली असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. आता त्यांनी त्यांचे बंधू व काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात प्रचार करण्याची घोषणा केली आहे. 

सेक्स स्कॅंडल प्रकरणात भाजप नेते रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाच जारकीहोळी बंधूंमधील लखन हे सर्वांत लहान असून, ते काँग्रेसमध्ये आहेत. सेक्स स्कँडलमागे शिवकुमार यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यावरुन लखन हे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने त्यांच्यासाठी गळ टाकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रमेश यांच्याविरोधात लखन यांचा पराभव झाला होता. लखन यांचे बंधू रमेश आणि भालचंद्र हे भाजप आमदार आहेत. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी मुलीसमवेत लखन जारकीहोळी यांची नुकतीच भेट घेतली. लखन यांनी अंगडी यांचा प्रचार करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर भाजपचे मंत्री जगदीश शेट्टर, उमेश कत्ती, बायरती बसवराज आणि खासदार एरन्ना कदादी व अण्णासाहेब जोल्ले यांनी लखन यांची भेट घेतली आहे. 

लखन जारकीहोळी यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात काँग्रेस केवळ एका पक्षावर अवलंबून आहे. हा नेता म्हणजे डी.के.शिवकुमार. काँग्रेसमध्ये राज्यात चार गट पडले असून, पक्षांतर्गत भांडणे वाढली आहेत. यामुळे पक्ष आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी ठरत आहे. माझे बंधू रमेश आणि भालचंद्र यांच्यासोबत चर्चा करुन मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार आहे. 

अश्लील व्हिडिओप्रकरणी कर्नाटकातील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर या व्हिडीओतील तरुणीने आणखी एक नवा व्हिडीओ जाहीर केला होता. त्यात तिने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्याकडे या प्रकरणात मदतीसाठी गेल्याचा दावा केला होता. यावर शिवकुमार यांनी मात्र, हात झटकले होते. या प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या भाजपने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

कर्नाटकमधील भाजप नेते व माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जारकीहोळी यांनी एका तरुणीसोबत केलेले अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ समोर आला होता. जारकीहोळी यांनी नोकरीते आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप या तरुणीने केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. 

या अश्लील व्हिडीओतील तरुणीने आणखी व्हिडीओ जारी केला आहे. यात तिने मदत मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेल्याचे म्हटले आहे. ते घरी नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे.  या प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या भाजपने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सेक्स स्कँडलमध्ये शिवकुमार यांची कोणती भूमिका होती, असा सवाल भाजपने केला आहे.  शिवकुमार यांनी भाजपची ही मागणी हसण्यावारी नेली. 

शिवकुमार यांनी मात्र, सावध भूमिका घेत या तरुणीला कधीही भेटलो नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की,  त्या तरुणीने मला भेटण्याचा प्रयत्न केला असेल. मी मला भेटण्यासाठीही आली असेल पण आमची भेट झाली नाही. आम्ही सार्वजनिक आयुष्यात आहोत. राजकारण्यांकडे अनेक लोक समस्या घेऊन येत असतात. तुम्हाला रोज शेकडो लोक माझ्या घरी आणि कार्यालयात अडचणी घेऊन येताना दिसतील. 

या सेक्स स्कँडलमधील आरोपी नरेश गौडा याच्याशी ओळख असल्याचे मात्र, शिवकुमार यांनी कबूल केले होते. ते म्हणाले होते की, मी नरेशला ओळखतो. तो माझ्या जवळचा आहे. त्याच्या घरीही मी अनेक वेळा गेलो आहे. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आम्ही भाजप नेत्यांवर काही काळ लक्ष ठेवून होतो. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com