..या पक्षाच्या आमदारांना जादा निधी मिळातो : बाळासाहेब थोरातांची खंत - Congress Leader Balasaheb Thorat Tries to Clarify Party MLA's Stand | Politics Marathi News - Sarkarnama

..या पक्षाच्या आमदारांना जादा निधी मिळातो : बाळासाहेब थोरातांची खंत

राजू सोनवणे
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

पुरेसा विकास निधी मिळत नसल्याची काँग्रेस आमदारांची तक्रार अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जादा निधी मिळतो, असाही त्यांचा आक्षेप आहे. त्यावरुन काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे वृत्त आहे. त्याबाबत आज थोरात यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई : ''काही आमदारांमध्ये  नाराजी आहे ती आम्ही बोलून घालवू. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे तर काहींना कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र मी त्या पक्षाचं नाव घेणार नाही. आमदारांना मतदारसंघ सांभाळायचा आहे म्हणून ते लढत आहेत. आमच्या पक्षातील नाराजी आणि आघाडी सरकारचा काही संबंध नाही," असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

पुरेसा विकास निधी मिळत नसल्याची काँग्रेस आमदारांची तक्रार अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जादा निधी मिळतो, असाही त्यांचा आक्षेप आहे. त्यावरुन काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचे वृत्त आहे. त्याबाबत आज थोरात यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. 

ते म्हणाले, " राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करू असं स्वतः मुख्यमंत्री मला म्हणाले आहेत. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचे आम्ही समाधान करू. आम्ही सर्व नेते मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.  काही आमदारांमध्ये नाराजी आहे ती आम्ही बोलून घालवू. मतदार संघाच्या प्रश्‍नांसाठी आमदार नाराज आहेत आमच्यासह मित्र पक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत त्यांचीही नाराज आम्ही दूर करू,''

दरम्यान, राज्यात केवळ आघाडी नाही तर महाविकास आघाडी आहे. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे. सरकार चालवताना थोडे इकडे तिकडे होणारच, अशी सारवासारव शिवसेनेने 'सामना'च्या माध्यमातून केली आहे. आमदारांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल व काँग्रेस पक्षासमोरील अडचणी वाढतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. काँग्रेसच्या आमदारांचा उपोषणाचा इशारा ही लोकशाही आहे हे मान्य असले तरी हे  ज्यांनी महाविकास आघाडी करायला परवानगी दिली त्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होती. तेव्हा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा 'महाविकास' मध्ये सहभागी होण्याला विरोध होता. पण कालांतराने त्यांचा विरोध निवळला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला. जर राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी जर या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर तो आम्हाला मान्य राहील, असे विधान राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख