काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादीने फोडला - congress leader and ex mla udesingh padvi entered in ncp | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादीने फोडला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

तळोदा : मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले शहादा-तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आज 'हाता'ची साथ सोडून हातावर 'घड्याळ' बांधले आहे. याआधी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने फोडले होते. यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सत्तेतील दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील नेता आता राष्ट्रवादीने फोडला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहादा - तळोदा मतदारसंघात भाजपने तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी नाकारत राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या पाडवींनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत काँग्रेसच्या तिकिटावर नंदुरबार मतदारसंघातून आमदार विजयकुमार गावित यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी ५० हजारांवर मते घेत चांगली लढत दिली होती. 

निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून लांब राहिला आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मागील दहा महिन्यांचा कालावधीत उदेसिंग पाडवी काँग्रेसच्या व्यासपीठावर जेमतेमच दिसले. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी केंद्रस्थानी असून जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठ्या नेत्याची कमतरता भासत आहे. हे हेरुनच माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश केला आहे. या वेळी त्याच्यासोबत मोहन शेवाळे, युवा नेते नितीन पाडवी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  हेमलता शितोळे, धडगाव तालुका अध्यक्ष सीताराम पावरा, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ तांबोळी आदी उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा वाटाघाटीत काँग्रेस पक्षाला सुटल्याने त्यावेळी शहादा - तळोदा मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे प्रमुख इच्छुक असलेले राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादीला नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या नेत्याची कमतरता भासत होती. मात्र, आता माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात तगडा नेता मिळाल्याने ती पोकळी भरुन निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करीत पक्षाला नंबर वन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काही जागा राष्ट्रवादीला सोडाव्यात यासाठी प्रयत्न करणार असून सुटलेल्या जागा कशा निवडून येतील त्यादृष्टीने मेहनत घेईन.
- उदेसिंग पाडवी, माजी आमदार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख