काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा? दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा ग्रीन सिग्नल - congress high command discuss with state ministers about party president | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा? दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा ग्रीन सिग्नल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासोबत प्रदेशाध्यक्षपदाबाबतही काँग्रेस नेतृत्वाने आज राज्यांतील नेत्यांसोबत खलबते केली. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत आज दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाने चर्चा केली. या चर्चेनंतर महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी लवकरच नवा चेहरा दिसेल, असे जाहीर केले. याचवेळी विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तरुण माणसाकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास चांगले होईल, असे सूचक विधान केले आहे. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा आढावा आज राज्यातील नेत्यांकडून पक्ष नेतृत्वाने घेतला. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही या बैठकीत ठोस चर्चा झाली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी आज पक्षाच्या सर्व मंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. पक्षाचे खजिनदार पवनकुमार बन्सल हेही या बैठकीला उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, सुनील केदार, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. 

बैठकीनंतर बोलताना प्रभारी एच. के.पाटील यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लवकरात लवकर होईल, असे जाहीर केले. विधानसभा अध्यक्ष बदलणार काय, या प्रश्नावर आताच काही बोलता येणार नाही, असे म्हणत पाटील टाळाटाळ केली. परंतु, बाळासाहेब थोरात ज्येष्ठ असतील तर नवा अध्यक्ष तरुण असेल आणि बाळासाहेब तरुण असतील तर नवा अध्यक्ष ज्येष्ठ असेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. माझ्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद आणि विधिमंडळ नेतेपद या कामांची विभागणी होणार असेल आणि तरुण माणसाकडे जबाबदारी दिली जात असेल तर चांगलेच आहे, असेही थोरात म्हणाले. 

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, मंत्र्याचे कामकाज आणि संघटनात्मक जबाबदारी यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नेतृत्व बदल तसेच, पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या आर्थिक तयारीच्याही मुद्द्यावर चर्चेत झाल्याचे समजते. महाराष्ट्राती महाविकास आघाडी सरकारमध्ये ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला होणारा विलंब, राज्यमंत्र्यांना असलेल्या मर्यादित अधिकाराबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख