काँग्रेसची धुरा सुरजेवालांच्या खांद्यावर...शत्रुघ्न सिन्हा अन् निरुपम यांच्यावर मोठी जबाबदारी - congress forms various committees for bihar assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसची धुरा सुरजेवालांच्या खांद्यावर...शत्रुघ्न सिन्हा अन् निरुपम यांच्यावर मोठी जबाबदारी

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आज बिहारसाठी अनेक समित्यांची घोषणा केली. 

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) एकत्र येऊन महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने बिहारसाठी अनेक समित्या तयार केल्या असून, पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या खांद्यावर सर्व महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि संजय निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. 

काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी रणदीप सुरजेवाला आहेत. या समितीत मीरा कुमार, तारिक अन्वर, शत्रुघ्न सिन्हा, किर्ती आझाद, शकील अहमद आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अणखी काही समित्या स्थापन करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. यात प्रसिद्धी समिती, माध्यम समन्वय समिती, सार्वजनिक सभा व सामग्री समिती, विधी समिती आणि कार्यालयीन व्यवस्थापन समित्यांचा समावेश आहे. 

प्रसिद्धी समितीच्या संयोजकपदी सुबोधकुमार आणि सहसंयोजकपदी जया मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम समन्वय समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांची आणि संयोजकपदी प्रेमचंद मिश्रा तर सहसंयोजकपदी राजेश राठोड यांची नियुक्ती झाली आहे. ब्रिजेश कुमार मुनान यांची सार्वजनिक सभा व सामग्री समितीच्या अध्यक्षपदी आणि वरुण चोप्रा यांची विधी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कार्यालयीन व्यवस्थापन समित्यांमध्ये अशोक कुमार आणि कौकाब कादरी यांचा समावेश आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख