भाजप  सरकार  म्हणजे  'नापास'  विद्यार्थ्यांचा 'वर्ग - अनंत  गाडगीळ

जिडीपी घसरणीत उचांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उचांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अश्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजप सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग' झाला आहे, संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी अशी उपरोधिक व खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
Congress Spokesperson Anant Gadgil
Congress Spokesperson Anant Gadgil

मुंबई : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देशाची विकासवाढ २४ टक्क्यांनी घसरली आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री असे संदेश (मेसेज) सोशल मीडियावर फिरू लागले असतानाही दुसरीकडे अश्या गंभीर व धक्कादायक बाबीवर काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक  गप्प आहेत. अर्थव्यवस्था सावरायची प्राथमिक जबाबदारी अर्थमंत्र्यांची असल्यामुळे या परीक्षेत अर्थमंत्री 'नापास' झाल्याचे सिद्ध झाले आहे. संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी, अशी उपरोधीक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

भाजप सरकारचा समाचार घेताना गाडगीळ पुढे म्हणाले, भारताचा आत्तापर्यंत मित्र राहिलेले उत्तरेकडील नेपाळ राष्ट्र हळूहळू चीनकडे सरकत आहे, पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारु लागला आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे, पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते.                   

हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अॅलन हो या चिनी हेराला ज्या 'बँक ऑफ चायना' मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी देणे ह्यात केंद्रीय गृह खात्याचा  बेजबाबदारपणा दिसून येतो, असेही गाडगीळ म्हणाले. 

सिंगापूर, न्यूझीलंड, व्हिएतनामपासून दुबईपर्यंत अनेक राष्ट्रांनी जानेवारीतच आपले विमानतळ बंद केले असताना ट्रम्प यांच्या गुजरातमधील निवडणूक मेळाव्यासाठी  मार्चअखेर पर्यंत भारताने विमानतळ उघडे ठेवले. १  जानेवारी ते १५ मार्च या काळात १० लाख प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले असता केवळ १९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, तीसुद्धा  पूर्वेकडून आलेल्यांची. आता तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत. हवाई वाहतूकमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही निष्भ्रम ठरले  आहेत, अशी टीका गाडगीळ यांनी केली. 

जिडीपी घसरणीत उचांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उचांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अश्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे  केंद्रातील भाजप सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा  'वर्ग' झाला आहे, संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी   निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी अशी  उपरोधिक व खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी  केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com