तमिळनाडू अन् पुदुच्चेरीत काँग्रेसची धुरा दिग्विजयसिंह सांभाळणार

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.
congress appoints digvijay singh as screening committee chairman for tamil nadu and puducherry
congress appoints digvijay singh as screening committee chairman for tamil nadu and puducherry

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. काँग्रेसने तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 

तमिळनाडूमध्ये सध्या अण्णाद्रमुकची सत्ता असली तरी आगामी निवडणुकीत पक्षांतून निलंबित करण्यात आलेल्या शशिकला यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. तमिळनाडू विधानसभेत 234 आमदार असून सध्या अण्णाद्रमुक आघाडीकडे 134 जागा आहेत. द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला या राज्यात खाते खोलता आले नाही. मात्र, यावेळी भाजपने सत्ताधारी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक होणार आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एआयएनआरसी या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. 

काँग्रेसने आता तमिळ आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी छाननी समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांची निवड करण्यात आली आहे. यात सदस्यपदी फ्रान्सिस्को सार्डिन्हा आणि कोडाईकन्निल सुरेश यांची निवड झाली आहे. पक्षाचे पदसिद्ध सदस्य म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी दिनेश गुंडू राव, तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी, पुदुच्चेरीचे प्रदेशाध्यक्ष ए.व्ही.सुब्रह्मण्यम, पक्षाचे नेते के.आर.रामास्वामी, व्ही. नारायणस्वामी आणि तमिळनाडू आणि केरळमधील सरचिटणीस यांची निवड करण्यात आली आहे. 

तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 824 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 18.68 कोटी मतदार आहेत. एकूण 2.7 लाख मतदान केंद्रे असणार आहेत. सर्व ठिकाणी सीएपीएफचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरही सीएपीएफ तैनात असेल. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्कर मानले जाणार आहे. 

यापैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची पाचपैकी एकाही ठिकाणी सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही ठिकाणी भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सभा, विविध विकासकामांचे उद्घाटन यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

निवडणूक तारखा : 
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल  
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 
केरळ : एकाच टप्प्यात 6  एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल  
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल  
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल 
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com