गेहलोत अन् पायलट यांच्या वादात पडली अविनाश पांडेंची विकेट - congerss party finally fulfilled sachin pilots demand and removed avinash pandey | Politics Marathi News - Sarkarnama

गेहलोत अन् पायलट यांच्या वादात पडली अविनाश पांडेंची विकेट

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

राजस्थानमधील सचिन पायलट यांचे बंड अखेर शमले आहे. काँग्रेसने आता पायलट यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमले आहे. पक्षाने पायलट यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेहलोत यांच्याशी चांगले संबंध असणारे राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांना काँग्रेसने डच्चू दिला आहे. गेहलोत आणि पायलट यांच्या संघर्षात अखेर पांडे यांची विकेट पडली आहे. पायलट यांच्या पुढील राजकीय भवितव्याबाबत मात्र, पक्ष नेतृत्वाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. 

पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पायलट यांनी पक्षाकडे काही मागण्या केल्या होत्या. यात राजस्थानमध्ये प्रभारी नेमलेल्या महाराष्ट्रातील अविनाश पांडे यांना हटवावे, अशी मागणीही होती. आता राजस्थानमधील काँग्रेस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून, सरकार स्थिर झाले आहे. यामुळे पक्षाने पायलट यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी उघड बंड केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता. पायलट यांनी पक्षासमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. यातील पहिली मागणी होती, पुढील 2023 च्या विधानसभा निवडणुकीआधी पक्षाने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. दुसरी मागणी होती की, त्यांच्या समर्थक आमदारांना चांगली खाती देणे आणि तिसरी मागणी होती की काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांना हटविणे. 

काँग्रेसने पायलट यांनी पक्ष संघटनेबद्दल केलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी समिती नेमली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या या समितीत अहमद पटेल, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल आणि अजय माकन यांचा समावेश आहे. अविनाश पांडे यांना प्रभारी पदावरुन पक्षाने तातडीने हटविले आहे. त्याजागी अजय माकन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पायलट यांचे बंड शमवून पक्ष अखेर राजस्थानातील सरकार स्थिर करण्यात यशस्वी ठरला आहे. पायलट यांनी माघार घेताना काही मागण्या पक्ष नेतृत्वासमोर ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यास पक्ष नेतृत्वाने सुरुवात केली आहे. यातील पहिली मागणी अविनाश पांडे यांना हटवण्याची होती. ही मागणी मान्य झाली असली तरी गेहलोत यांना हा धक्का बसला आहे. गेहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्षात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून पांडे हे केंद्रस्थानी होते. अखेर पांडे यांना हटविण्यासाठी पायलट यांनी पक्ष नेतृत्वाला भाग पाडले  आहे. दोघांच्या वादात पांडे यांचा बळी गेला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

पांडे हे गेहलोत यांना पक्ष संघटनेत झुकते माप देत असल्याने पायलट यांचा त्यांच्यावर रोख होता. यामुळे पायलट यांच्या बंडाला पांडे यांची 2017 मध्ये झालेली नियुक्तीही एक कारण असल्याचे समोर आले आहे. पांडे हे मूळचे नागपूरमधील आहेत. पांडे हे याआधी युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. याचबरोबर  ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. तसेच, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उद्योगपती राहुल बजाज यांनी 2008 मध्ये राज्यसभा निवडणुकीत पांडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2010 मध्ये ते बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले होते.  

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख