सरकारी कंपनीचं दातृत्व; मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्याला दिले तब्बल सोळा कोटी

सृष्टी राणी ही 'स्पायनल मस्क्यूलर एट्रॉफी' (SMA) या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे.
Srishti Rani
Srishti RaniSarkarnama

नवी दिल्ली : दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या दोन वर्षाच्या मुलीच्या उपचारासाठी एका सरकारी कंपनीने कर्मचाऱ्याला तब्बल 16 कोटी रुपये दिले आहेत. एखाद्या सरकारी कंपनीने एवढी मोठी रक्कम देण्याची ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा आहे. कंपनीकडून मुलीच्या वडिलांना शुक्रवारी या रकमेचा धनादेश दिला. त्यामुळे मुलीवर उपचार करणे शक्य होणार आहे.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (SECL) या सरकारी कंपनीने हे दातृत्व दाखवले आहे. सतीश कुमार रवि असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची दोन वर्षाची मुलगी सृष्टी राणी ही 'स्पायनल मस्क्यूलर एट्रॉफी' (SMA) या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होणाऱ्या या आजारामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो.

Srishti Rani
मंत्रिमंडळ विस्तारावर पायलट यांच्याकडून काँग्रेसला टोला; म्हणाले...

या आजाराचा उपचार खर्च प्रचंड आहे. उपचारासाठी वापरले जाणारे इंजेक्शन 'जोलजेंस्मा'ची किंमतच 16 कोटी रुपये एवढी आहे. सृष्टी राणीच्या आजाराबाबत कंपनीला माहिती मिळाल्यानंतर उपचाराच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल इंडियाने आपल्या कुटुंबातील एका मुलीला उपचारासाठी 16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सतीश कुमार यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे.

सतीश यांच्याकडे उपाचारासाठी एवढे पैसे नव्हते. एवढे महागडे इंजेक्शन खरेदी करणे त्यांना शक्यच नव्हते, असेही अधिकाऱ्याने सांगितले. देशात सध्या वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कोळशाची मागणीही वाढली आहे. या स्थितीत कोल इंडिया व संलग्न कंपन्यांतील कर्मचारी कोळसा पुरवठा वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर 'एसईसीएल'ने ही आर्थिक मदत केली आहे.

कोरबा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार ज्योत्स्ना चरणदास महंत यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कोल इंडियाकडून (Coal India) या मदतीबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. 'आपले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब हीच खरी संपत्ती असल्याचे सीआयल (CIL) मानते. त्यामुळे 16 कोटी रुपये देण्यात आले. पीडित मुलीवर संबंधित इंजेक्शन दिल्यानंतरच उपचार करणे शक्य आहे,' असं कंपनीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com