मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची तक्रार अन् थेट मंत्र्याच्या सहकाऱ्यालाच अटक - close aide of minister arrested after complaint of chief minister son | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची तक्रार अन् थेट मंत्र्याच्या सहकाऱ्यालाच अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या तक्रारीनंतर थेट मंत्र्याच्या सहकाऱ्यालाच अटक झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) अंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. यातच आता मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांच्या पुत्राच्या तक्रारीनंतर थेट मंत्र्याच्या निकटवर्ती सहकाऱ्यालाच अटक झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

कर्नाटकचे मंत्री बी.श्रीरामलू यांचे सहकारी राजन्ना यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे श्रीरामलू यांच्या निवासस्थानाबाहेरच त्यांना अटक झाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांनी तीन दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. राजन्ना यांच्यावर कर्नाटक माहिती तंत्रज्ञान कायद्यासोबत भारतीय दंड विधान 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कर्नाटक सरकारमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षाचा संबंध या कारवाईशी जोडला जात आहे. 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

हेही वाचा : काँग्रेस वाचवा..! पक्षाचे 15 नेते हाय कमांडच्या भेटीसाठी दिल्लीत 

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. विश्वनाथ म्हणाले होते की, येडियुरप्पा यांचे वय 78 आहे. त्यांना आतापर्यंत पक्षासाठी दिलेले योगदान मोठे आहे. परंतु, आता वय आणि आरोग्यामुळे त्यांना काम करणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम घराणेशाहीच्या विरोधात बोलत असतात. मग कर्नाटकात हाच प्रकार कसा सुरू आहे. कर्नाटकातील भाजप मोदींना विसरली आहे. सरकारबद्दल जनमत नकारात्मक बनले आहे. 

कवडीमोल किमतीने खासगी कंपन्यांना सरकारी जमीन दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी 20 हजार कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प कोणत्याही बैठकीविना मंजूर केले, असा आरोपही विश्वनाथ यांनी केला होता. विश्वनाथ यांनी यात राज्य भाजपमधील वादात पंतप्रधानांना ओढले होते. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख