सरन्यायाधीश बोबडे कार्यकाळाबाबत समाधानी पण शेवटचा दिवस संमिश्र अनुभवाचा! - cji sharad bobde says experience of last day in supreme court is mixed emotion | Politics Marathi News - Sarkarnama

सरन्यायाधीश बोबडे कार्यकाळाबाबत समाधानी पण शेवटचा दिवस संमिश्र अनुभवाचा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

सरन्यायाधीश शरद बोबडे हे आज निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात ऐतिहासिक अयोध्या खटल्यासह अनेक खटले निकाली निघाले. 

नवी दिल्ली : ऐतिहासिक अयोध्या खटल्यासह अनेक महत्वाचे खटले निकाली काढणारे सरन्यायाधीश शरद बोबडे हे आज निवृत्त झाले. त्यांनी ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये शपथ घेतली होती. निवृत्त झाल्यानंतर बोलताना त्यांनी न्यायाधीशपदाचा कार्यकाळ समाधानकारक राहिल्याची भावना व्यक्त करतानाच शेवटचा दिवस संमिश्र अनुभवाचा असल्याचे म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील शेवटच्या दिवशी देशातील कोरोना संकटाच्या प्रकरणावर त्यांच्यासमोर सुनावणी झाली. ते म्हणाले की, या शेवटच्या सुनावणीचा माझा अनुभव संमिश्र आहे. मी आनंदाने, सदिच्छेने आणि चांगल्या आठवणींसह निवृत्त होत आहे. न्यायालयातील एकापेक्षा एक सरस युक्तिवाद, वकिलांची उत्तम मांडणी, चांगले वर्तन याच्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत. 

देशात कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधांची टंचाई निर्माण झाली असून, लसीकरणाबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाला मदत करण्यासाठी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी विधिज्ञ हरीश साळवे यांची अमॅकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून नियुक्ती कालच (ता.22) केली होती. मात्र, इतर ज्येष्ठ वकिलांनी शेरेबाजी केल्याने साळवे हे या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. काही ज्येष्ठ वकील न्यायालयाने दिलेला निकाल न वाचताच शेरेबाजी करतात, अशी खंत सरन्यायाधीशांनी आज व्यक्त केली.  

हेही वाचा : सरन्यायाधीश बोबडेंचा शेवटचा दिवस अन् साळवेंनी घेतलेली माघार 

यावर बोलताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनी साळवे यांनी विनंती केली. अशा प्रकारच्या दबावाला साळवे यांनी बळी पडू नये, असे आवाहनही मेहतांनी केले. परंतु, साळवे ठाम राहिल्याने न्यायालयाने अखेर त्यांची विनंती मान्य केली. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे  म्हणाले की, साळवे यांना अमॅकस क्युरी म्हणून नेमल्यानंतर अनेक ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केलेली मते पाहून मला दु:ख झाले. हा माझा एकट्याचा नव्हे तर खंडपीठातील सर्व न्यायाधीशांना घेतलेला निर्णय होता. 

शरद बोबडे यांचा कार्यकाळ 
२४ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे जन्मलेले शरद बोबडे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कायद्याची पदवी नागपूर विद्यापीठातून घेतली. १९७८ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांचे नाव नोंदले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. त्यांना १९९८ मध्ये ज्येष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. त्यांना २९ मार्च २००० रोजी पदोन्नती मिळाली आणि ते सहन्यायाधीश बनले. त्यांनी १६ ऑक्टोबर २०१२ रोजी मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. १२ एप्रिल २०१३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रुजू झाले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख