आरोपी क्रमांक 1 : चंद्राबाबू नायडू हाजीर हो..!

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे अडचणीत आले आहेत. त्यांना सीआयडीने नोटीस बजावली आहे.
cid asks tdp chief chandrababu naidu to appear before it on 23 march
cid asks tdp chief chandrababu naidu to appear before it on 23 march

हैदराबाद : अमरावती येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) आज तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख व माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना नोटीस बजावली आहे. चौकशीसाठी 23 मार्चला सीआयडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले असून, यात नायडू हे आरोपी क्रमांक एक आहेत. 

सीआयडी पथकातील सहा तपास अधिकारी हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी पोचले. नायडूंना 23 मार्चला सीआयडीच्या विजयवाडा येथील प्रादेशिक कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अमरावती जमीन गैरव्यवहार प्रकरणी नायडूंच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

नायडू हे चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 (1) व (3) नुसार अटक करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित राजधानीसाठी हजारो एकर जमीन ताब्यात घेतल्याचे हे प्रकरण आहे. यात नायडू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. 

याबाबात आंध्र प्रदेशचे सीआयडी प्रमुख सुनीलकुमार म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांना २३ मार्चला विजयवाडा येथील सीआयडीच्या प्रादेशिक कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. रामकृष्ण रेड्डी यांच्या तक्रारीची दखल घेत १२ मार्चला सीआयडीने या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. चंद्राबाबू नायडू यांच्याव्यतिरिक्त नोटिशीत अन्य आठ जणांची नावे आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे सरकार सापत्न वागणूक देत असून सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे तेलगू देसम पक्षाने म्हटले आहे. न्यायासाठी तेलगू देसम पक्ष लढाई लढेल, अशी भूमिका पक्षाने घेतली. तेलगू देसम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अत्वनायडू यांनी म्हटले की, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कुटुंबाने कडप्पा जिल्ह्यात सातशे एकरपेक्षा अधिक जमिनीवर 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून ताबा घेतलेला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीनशे एकर जमीन परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचे पुढे काहीही झाले नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com