धक्कादायक : कोरोना लस तयार करणारी भारत बायोटेक अन् सिरम इन्स्टिट्यूट चिनी हॅकर्सच्या टार्गेटवर

आता चिनी हॅकरनी देशातील कोरोना लस उत्पादक कंपन्यांना लक्ष्य केल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे.
chinese hacker target bharat biotech and serum institute
chinese hacker target bharat biotech and serum institute

मुंबई : चीन सरकारचे पाठबळ असलेल्या हॅकिंग ग्रुपने भारतातील कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट या दोन कंपन्यांच्या आयटी सिस्टिमवर मागील काही आठवड्यांत सायबर हल्ले केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या दोन्ही कंपन्यांच्या कोरोना लशीचा वापर सध्या सरकारकडून लसीकरणासाठी केला जात आहे, असे सायबर इंटेलिजन्समधील सायफर्मा या संस्थेने म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

भारत आणि चीन या दोन्ही स्पर्धक देशांनी कोरोना लस अनेक देशांना विकली आहे अथवा मोफत दिली आहे. जगभरात विकल्या जाणाऱ्या लशींपैकी 60 टक्के लशीची भारतात निर्मिती होते. चीन सरकारचे पाठबळ असलेल्या 'एपीटी10' या ग्रुपने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या आयटी सिस्टिमवर सायबर हल्ला केला. या ग्रुपला स्टोन पांडा या नावानेही ओळखले जाते.  

कोरोना लशीचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला करण्यामागे हॅकरचा बौद्धिक संपदा मिळवण्याचा प्रयत्न होता. याद्वारे भारतीय औषधनिर्माण कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकण्याचा डाव खेळण्यात आला होता. भारतीय कंपन्यांची आयटी सिस्टीम कमकुवत आणि तकलादू असल्याने त्यांना हॅक करणे शक्य होत आहे. त्यामुळे त्या कायम हॅकरच्या टार्गेटवर असल्याचे सायफर्माने म्हटले आहे. 

मुंबईतील बत्ती गुलमागेही चिनी हॅकर्स 

दरम्यान, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला होता. या बत्ती गुलमागे चीनचा हात असल्याचा दावा केला जात आहे. चीनकडून सायबर हल्ला करून भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला आहे. चीनमधील रेडइको या समूहाने भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य केले होते. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणाव वाढला होता. याच कालावधीत चीनकडून या यंत्रणेत मालवेअर सोडण्यात येत होते, असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. याबाबत देशमुख व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

देशमुख म्हणाले की, मुंबईमध्ये 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या बत्तीगुलमागे सायबर हल्ल्याची दाट शक्यता आहे. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या काही आयटी कंपन्यांनी मुंबईच्या इलेक्ट्रीकल सप्लायर्सच्या सर्व्हरमध्ये लॉगीन करून मालवेअर टाकण्याचा प्रयत्न केला. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com