होय, आमचेही सैनिक गल्वानमध्ये मारले गेले! चिनी ड्रॅगनची अखेर कबुली - china finally admits about galwan valley clash casualties | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

होय, आमचेही सैनिक गल्वानमध्ये मारले गेले! चिनी ड्रॅगनची अखेर कबुली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गल्वान खोऱ्यातील संघर्षात सैनिक ठार झाल्याबाबत वाच्यता न करणाऱ्या चिनी ड्रगनने अखेर याची कबुली द्यावी लागली आहे. 

नवी दिल्ली : मागील वर्षी भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात गोळीबार न होताही भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. मात्र, एवढे दिवस चीनने आपले सैनिक ठार झाल्याबाबत कोणतीही वाच्यता केली नव्हती. अखेर चीनला आपले सैनिक गमावल्याची कबुली द्यावी लागली आहे. चीनने या सैनिकांचा मरणोत्तर गौरव केला असून, यातून ही बाब समोर आली आहे. 

मागील वर्षी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहेत. यातून तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा तोडगा निघाला होता. त्यानुसार 15 जून 2020 रोजी रात्री गल्वान खोऱ्यातून चीनचे सैन्य माघार घेत होते. त्यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार जुंपली आणि त्यातूनच दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. 

गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. 

त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंकडून गोळीबार झालेला नव्हता.

गल्वानमध्ये नेमके किती सैनिकी मारले गेले याचा माहिती चीनने अद्यापपर्यंत दिली नव्हती. अखेर गल्वानमध्ये ठार झालेल्या सैनिकांचा मरणोत्तर गौरव करुन चीनने याची कबुली दिली आहे. गल्वानमध्ये ठार झालेल्या 4 सैनिकांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे. याचबरोबर या संघर्षात गंभीर जखमी झालेल्या कर्नलचाही सन्मान करण्यात आला आहे. यामुळे ही माहिती समोर आली आहे.

भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना प्रथमच गल्वानमध्ये घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख