चीनचे शेपूट वाकडेच...भारतीय सीमेवर तैनात केले साठ हजार सैनिक

भारत आणि चीनमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. वादावर चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न भारत करत असतानाच चीनकडून दुसरीच खेळी सुरू आहे.
china deployed sixty thousand troops on india border says mike pompeo
china deployed sixty thousand troops on india border says mike pompeo

वॉशिंग्टन : भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणावाचे वातावरण आहे. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एकीकडे चर्चा करीत असताना दुसरीकडे चीन सीमेवरील सैन्य वाढवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या सीमेवर चीनने साठ हजार सैनिक तैनात केले आहेत, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला आहे. 

'क्वाड' गटाचे सदस्य असणाऱ्या अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक नुकतीच टोकियोत पार पडली. यामध्ये चीनच्या आक्रमक वर्तनावर चर्चा करण्यात आली. दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कारवाया आणि पूर्व लडाखमधील घुसखोरी आदी मुद्दे यातील चर्चेच्या केंद्रस्थानी होते. 

टोकियोतील बैठकीवेळी पॉम्पिओ यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या वेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी प्रगती, शांतता, विकास आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करण्यावर भर दिला होता. जयशंकर यांच्यासोबतचा संवाद फलदायी ठरल्याचेही पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.  

या बैठकीनंतर अमेरिकेला परतलेल्या पॉम्पिओ यांनी माध्यमांशी बोलताना चीनचा युद्धखोर चेहरा उघड केला. ते म्हणाले की, भारताच्या सीमेवर चीनने साठ हजार सैनिक तैनात केले आहेत. चीनचे हे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असून, क्वाड गटाच्या सदस्य असणाऱ्या देशांसाठी हा धोका निर्माण करण्याचा प्रकार आहे. 'क्वाड'मध्ये चार मोठ्या लोकशाही देशांचा समावेश होतो. हे चारही देश आकाराने मोठे आहेत. प्रत्येकासमोर असणारी आव्हानेही परस्परांशी निगडित अशी आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. चीनसोबत लढ्यात भारताला अमेरिकेची साथ लागेल.  

'क्वाड'चे सदस्य काही काळ बेसावध राहिले होते. पश्चिमेकडील देशांनीच चिनी कम्युनिस्ट पक्षासाठी दारे खुली केली होती. चीनला आम्हीच बौद्धिक संपदा चोरण्याची संधी दिली. आता चिनी कम्युनिस्टांना 'क्वाड' विरोध करू शकतो. 'क्वाड'च्या सदस्यांना चीनविरोधात अमेरिकेची साथ असेल. कोरोना संकटावरून चीनने ऑस्ट्रेलियासही धमकावले होते, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.  

भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com