नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर मागील काही काळापासून तणावाचे वातावरण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्य वाढवण्यात येऊ लागले आहे. विशेष म्हणजे क्षेपणास्त्रे आणि तोफाही सीमेवर वाढवण्याचे पाऊल चीनने उचलले आहे.
गल्वान खोऱ्यात मागील वर्षी झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत-चीन सीमेवर मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात त्यावेळी झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. मात्र, चीनने त्यांचे किती सैनिक ठार झाले याची आकडेवारी जाहीर केलेली नव्हती. पूर्व लडाखमध्ये अनेक भागात चीनने घुसखोरी केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
गल्वानची जखम अजून ताजीच...गोळीबार न होताही 20 जवान झाले होते हुतात्मा
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरून चीनने तैनात केलेले सैन्य हटविण्याबाबत भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवरील नऊ बैठका झाल्या आहेत. एकीकडे चीनकडून चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे सीमेवर चीनचे सैन्य वाढत आहे. चीनकडून पूर्व लडाखमधील प्योगाँग सरोवराच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले जात आहेत. क्षेपणास्त्र आणि शस्त्रेही तेथे आणली जात आहेत.
पूर्व लडाखमध्ये भारत व चीन दरम्यान 3 हजार ४८८ किलोमीटर लांबीची सीमा आहे. मागील वर्षी तेथे दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक झटापट झाल्यापासून तेथील चिनी सैन्य हटविण्यासाठी चर्चच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. तरी चीनच्या कुरबुरी सुरू असून, त्या आणखी वाढू लागल्या आहेत. चीनने सीमेवरील तीन विभागांत सैनिकांसह तोफखाना, स्वयंचलित हॉवित्झर तोफा आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. याचबरोबर प्योगाँग सरोवराच्या क्षेत्रात नवे बांधकाम सुरू केले आहे.
दक्षिण विभागात चीन आता नव्याने सैन्याची कुमक वाढवत आहे. चीनच्या सैन्य तळावर या सर्व हालचाली वेगाने सुरू आहेत. चीनचा हा तळ नियंत्रण रेषेपासून ८२ किलोमीटर अंतरावरील पूर्व लडाखमध्ये आहे. मागील महिन्यात चीनने रुडोक निरीक्षण चौकीजवळ सैनिकांसाठी चार नव्या छावण्या उभारल्या होत्या. याचबरोबर बांधकाम केल्याचेही समोर आले होते. रुडोक आणि शिक्नेह येथील सैनिकी चौक्या चीनच्या ताब्यातील अक्साई चीनमध्ये आहेत.
प्योगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर-4 आणि फिंगर-7 मध्ये चीनने सैन्य वाढवले आहे. स्पंगगुर सरोवराच्या जवळपास चीनी सैनिकांची संख्येत डिसेंबर २०२० नंतर सातत्याने वाढ होत आहे. लडाखमधील एक हजार ५९७ किलोमीटरच्या परिसरात दीर्घकाळ सैन्य तैनात ठेवण्याची तयार चीनने केली आहे.

