योगी खडबडून जागे...एसपी, डीएसपी, निरीक्षकांसह इतर अधिकारी एकाच फटक्यात निलंबित

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात संतापाचे वारे आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जागे झाले आहेत.
UP Chief Minister Yogi Adityanath has directed to suspend the SP DSP Inspector and some others officials
UP Chief Minister Yogi Adityanath has directed to suspend the SP DSP Inspector and some others officials

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना राज्य सरकारने 'नो एंट्री' केली आहे. आता प्रसारमाध्यमांनीही हाथरसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना झाली आहे. एसआयटी तपासाचे कारण यासाठी यासाठी पुढे करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर खडबडून जागे झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकाच फटक्यात एसपी, डीसपींसह इतर अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार नराधमांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. णमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे.  

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना उत्तर प्रदेश सरकारने प्रवेश बंदी केल्यानंतर आता प्रसारमाध्यमांनाही हाथरसमधून बाहेर काढण्यात आले आहे. याविषयी बोलताना हाथरसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश कुमार म्हणाले की, या प्रकरणी एसआयटीने तपासास सुरूवात केली आहे. एसआयटीचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रसारमाध्यमांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहून राजकीय नेते अथवा राजकीय शिष्टमंडळांनाही गावात प्रवेश दिला जाणार नाही.

आता मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com