सरसंघचालकांप्रमाणे काळी टोपी वापरणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू आहे का...ठाकरेंचा रोख कोणावर? - chief minister uddhav thackeray targets governor bhagat singh koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

सरसंघचालकांप्रमाणे काळी टोपी वापरणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू आहे का...ठाकरेंचा रोख कोणावर?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती भाषणाने गाजला. त्यांनी जोरदार हल्लाबोल करीत विरोधकांचा समाचार घेतला. 

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व पूजाअर्चांपुरते मर्यादित होतेय, असे विधान आज सकाळी केले होते. याचा धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांना टोला लगावला. सरसंघचालकांप्रमाणे काळी टोपी घालणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांनी हे समजून घ्यावे, असे ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेचा दसरा मेळावा आज स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित मेळाव्याला उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 

राज्यातील मंदिरे उघडावीत, अशी मागणी भाजपकडून वारंवार केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ठाकरे यांनी यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा आधार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे कोश्यारी हे सुद्धा काळी टोपी वापरतात, याचा धागा पकडून ठाकरेंनी कोश्यारींवर निशाणा साधला. 

ठाकरे म्हणाले की, मंदिरे उघडा अशी मागणी वारंवार केली जात. या मुद्द्यांवर काहींची मजल आमचे हिंदुत्व काढण्यापर्यंत गेली. बाबरी पाडल्यानंतर जो आगडोंब उसळला त्यावेळी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख उभे राहिले म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र वाचला. आता हिंदुत्वाचे गप्पा मारणारे त्यावेळी शेपूट घालून घरातच बसले होते. त्यांना त्यावेळी त्यांच्या घरच्यांशिवाय कोणीही ओळखतही नव्हते. 

आम्हाला दुसऱ्या कुणी हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. हिंदुत्व हे काय पूजा आणि कर्मकांडापुरते मर्यादित नसते. सरसंघचालक मोहन भागवतांनीही आज हिंदुत्व संकुचित होत असल्याबद्दल उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यांच्याप्रमाणे काळी टोपी घालणाऱ्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांनी याचा विचार करावा, असा टोला ठाकरे यांनी लगावला. 

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे झाला नाही. याला कारण होते कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त  ५० जणांच्या उपस्थितीत झाला. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. हा मेळावा शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख