अशोक चव्हाणांवरील जबाबदारी वाढवून मुख्यमंत्र्यांचा भाजपसह मेटेंना दणका - chief minister uddhav thackeray gives additional responsibility to ashok chavan | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाणांवरील जबाबदारी वाढवून मुख्यमंत्र्यांचा भाजपसह मेटेंना दणका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाण यांना हटवावे, अशी मागणी भाजप आणि विनायक मेटे करीत असताना राज्य सरकारने उलट त्यांच्यावरील जबाबदारी वाढविली आहे. 

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांवरील जबाबदारी वाढवून भाजपसह मेटेंना दणका दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे. मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल.

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. मागील काही दिवस विनायक मेटेही हीच मागणी करीत होते. मराठा आरक्षणाच्या मद्यावरून अशोक चव्हाण व आमदार विनायक मेटे यांच्यात शीतयुध्द भडकले आहे. मेटे म्हणाले होते की, मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मराठा आंदोलनाला भाजपचे नाव जोडत आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत. आम्ही मराठा समन्वय समितीकडून त्यांच्या चुका होतात हे स्पष्टपणे सांगत आहोत. मग राग येण्याचे कारण काय? अशोक चव्हाणांच्या मनात मराठा आरक्षणाबद्दल पाप आहे का? 

मेटे म्हणाले होते की, उगाच हवेमध्ये गोळ्या मारण्यात काय अर्थ. मंत्री अशोक चव्हाण यांचे न्यायालयात चुकत असल्याचा मराठा आरक्षण समन्वय समितीचा दावा आहे. न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी नको असे आमचे मत पूर्वीपासून होते. प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावे, एकत्रित सुनावणी घ्यावी, अन वकील नेमण्यातही त्याच चुका केलेल्या आहेत असे आमचे खात्रीशिर सांगणे आहे. 

अशोक चव्हाण यांच्या चुकांमुळेच नोकरभरती थांबली. यात नेमका भाजपचा कट कोणता, षडयंत्र कोणते, भाजपचा पुरस्कृतपणा कोणता हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांच्याच मनामध्ये आरक्षणाबद्दल, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत पाप आहे का, हे स्पष्ट त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनी मेटे यांनी केले. आपण अगोदरही  आघाडी सरकार असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करायचो, गेली ३० वर्षांपासून कोणतेही सरकार असो मी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला जाब विचारला आहे. आताही तेच काम करत असल्याचे विनायक मेटे म्हणाले होते.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख