उद्या पुन्हा बाहेर जाऊन घंटा वाजवू नका! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - chief minister slams opposition leaders over temple reopening demand | Politics Marathi News - Sarkarnama

उद्या पुन्हा बाहेर जाऊन घंटा वाजवू नका! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचवेळी सध्या कोरोना संकटातील सहकार्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार सुनावले. 

मुंबई : कोरोना संकटाविषयी सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काळजी दाखविली आहे. उद्या पुन्हा मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा असे म्हणून घंटा वाजवू नका. कृपा करुन आपल्याकडून सरकारला मदत होईल अशा सहकार्याची मी अपेक्षा करतो. नुसता घंटानाद करुन काहीही होत नाही हे आता जागतिक सत्य आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी आज लगावला. 

विधिमंडळाचे अधिवेशनात आज विधान परिषदेत विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात सहकार्य केल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद. विरोधकांनाही धन्यवाद. सर्व धर्मियांनी अतिशय साधेपणाने सण  आणि उत्सव साजरे केले आहेत. कोरोनाचे संकट फार विचित्र आहे. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी मला फोन केला, त्यावेळी मी त्यांच्याशी बोललो होता. मात्र, पत्रांना उत्तर दिले नाही, अशी त्यांची तक्रार आहे. यापुढे त्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तर दिले जाईल गैरसमज नकोत. पत्राला उत्तर देण्यापेक्षा पत्रात काय आहे यावर निर्णय घेणे महत्वाचे आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका क्षणात लॉकडाउन लागू केला. आपण थाळ्या, घंटा बडवल्या आणि  अनेकांना वाटले की थाळ्या बडवल्या म्हणजे कोरोना गेला. काही तरी पवित्र वातावरण निर्माण झाले आणि कोरोना निघून गेला. तसे काही झाले नाही. प्रत्यक्षात ती कृती जनजागृतीसाठी होती. कोविडयोद्धांना मानवंदना देण्यासाठी होती. अनेकांचा यात गैरसमज झाला. आता लक्षात आले की घंटानाद करून आता काही होत नाही. कोरोनावर प्रत्यक्ष अजूनही औषध आलेले नसून लसही मिळालेली नाही. महाराष्ट्राने जम्बो हॉस्पिटल विक्रमी वेळेत उभे केले. जिथे आवश्यकता तिथे सुविधा वाढवत आहोत. हळूहळू एकेक गोष्टी उघडत आहोत. या सर्व टप्प्यांवर सगळ्यांचेच सहकार्य गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवी मोहीम : माझे कुटुंब; माझी जबाबदारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लढाईतील पुढचा टप्पा जाहीर करत `माझे कुटुंब; माझी जबाबदारी` मोहिमेचे रणशिंग फिंकले. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी विविध मुद्यांचा परामर्श घेत सरकार कोरोनाच्या स्थितीत कशा पद्धतीने काम करत आहे, याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला, सर्वधर्मीय जनतेला धन्यवाद देतो आहे. हे संकट म्हणजे विषाणू विरोधातील युद्ध आहे. खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे आपण लढा देतो आहोत. मार्च, एप्रिल, मे मध्ये रुग्ण संख्येची वाढ मर्यादीत ठेवू शकलो. अजूनसुद्धा कोरोनाचे संकट लवकर जाईल, असे दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. यापुढेही येणाऱ्या महामारीला सामोरे जावे लागेल, असे सांगितले आहे. यापुढेही आपल्याला जपून पावले टाकावे लागेल. दक्षता घ्यावी लागेल. गाफील राहून चालणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख