चिदंबरम म्हणाले, 'मेसेंजर ऑफ गॉड' असलेल्या अर्थमंत्री आता उत्तर देतील का? - chidambaram targets nirmala sitharaman on act of god comment | Politics Marathi News - Sarkarnama

चिदंबरम म्हणाले, 'मेसेंजर ऑफ गॉड' असलेल्या अर्थमंत्री आता उत्तर देतील का?

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेसाठी अॅक्ट ऑफ गॉड कारणीभूत असल्याचे विधान केले होते. यावरुन आता वादंग उठला आहे. 

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून, तिची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अॅक्ट ऑफ गॉड म्हणजेच देवाचे कृत्य कारणीभूत असल्याचे विधान केले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. याच मुद्द्यावरुन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, कोरोना महामारीच्या संकटामुळे वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलनातील तूट 2.35 लाख कोटी रुपये आहे. यावर्षी आपल्याला अनपेक्षित अशी स्थिती पाहायला मिळत आहे. आपण अॅक्ट ऑफ गॉडला सामोरे जात आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत घसरण होऊ शकते. केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षासाठी राज्यांना भरपाईपोटी 1.65 लाख कोटी रुपये दिले आहेत. यात मार्च महिन्यातील 13 हजार 806 कोटी रुपयांचा समावेश आहे. जीएसटी भरपाईपोटी जमा केलेला उपकर हा केवळ 95 हजार 444 कोटी रुपये होता. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील व्यापार आणि उद्योग ठप्प झाले होते. यामुळे केंद्र सरकारसह राज्यांच्या तिजोरीला मोठी झळ बसली आहे. राज्यांकडून जीएसटी भरपाईची मागणी केंद्राकडे वांरवार केली जात आहे. याचवेळी केंद्र सरकारही रिकामी झोळी राज्यांना दाखवून हात वर करीत आहे. 

आता या मुद्द्यावरुन चिदंबरम यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महामारी ही जर अॅक्ट ऑफ गॉड असेल तर ही महामारी येण्याआधी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या काळात अर्थव्यवस्था चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आली याला आपण काय म्हणणार आहात? अर्थमंत्री या मेसेंजर ऑफ गॉड म्हणून याचे उत्तर देतील का? 

देशाच्य विकास दरात सातत्याने घसरण होत असल्याचा मुद्दा चिदंबरम यांनी उपस्थित केला होता. विकास दर 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीत 7.1 टक्के होता. तो 2017-20 मधील चौथ्या तिमाहीत 3.1 टक्क्यांवर घसरला आहे. या मुद्द्यावरुनही चिदंबरम यांनी सरकारला लक्ष्य केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख