कानाखाली मारणारे जिल्हाधिकारी म्हणाले, संतापाच्या भरात माझ्या हातून हे घडले असून मी माफी मागतो!

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. यात अनेक ठिकाणी नागरिकांवर बळाचा वापर केला जात आहे.
chhattisgarh ias officer apologizes for slaping youth for violating covid norms
chhattisgarh ias officer apologizes for slaping youth for violating covid norms

रायपूर : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. संचारबंदी असताना लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणाचा मोबाईलही जिल्हाधिकाऱ्यांनी संतापून रस्तावर आपटल्याचे दिसत आहे. यावरुन मोठा गदारोळ उडाल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

याबाबत छत्तीसगडमधील सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन जाहीर माफी मागितली आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावर माझा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात मी एका तरुणाला कानाखाली मारताना दिसत आहे. संबंधित तरुणाने लसीकरणासाठी जात असल्याचे सांगितले होते परंतु, त्याच्याकडे याचा कोणताही पुरावा नव्हता. त्यानंतर त्याने त्याच्या आजीला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगितले. यामुळे मी संतापाच्या भरात त्याच्याशी गैरवर्तन केले. 

माझ्या वर्तनाबद्दल मी माफी मागतो. संबंधित तरुणाचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तो तरुण अतिशय वेगाने दुचाकी चालवत होता. त्याला दुचाकी थांबवण्यास सांगूनही त्याने ऐकले नव्हते. त्याने इतर अधिकाऱ्यांशीही उद्धटपणे वर्तन केले. मी आताच कोरोनातून बरा झालो आहे. माझी आई अजूनही कोरोनाशी लढत आहे. सूरजपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आम्ही सर्व सरकारी कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी लढत आहोत, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे. 

ही घटना छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.२२) घडली. जिल्ह्यात लॉकडाउन होती. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा हे रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी करीत होते. त्यावेळी लसीकरण करण्यासाठी एक तरुण दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिसांनी त्याला अडवले. त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी त्याने लसीकरण करण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले होते. 

त्या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची कागदपत्रे आणि मोबाईलवरील इतर कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या कानाखाली लगावून त्याचा मोबाईळ रस्त्यावर आपटला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, असा आदेशही पोलिसांना दिला होता. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. जिल्हाधिकारीच कायदा हातात घेऊ लागले तर इतरांनी काय करायचे, असा सवाल नेटिझन सोशल मीडियावर विचारू लागले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com