एक थप्पड जिल्हाधिकाऱ्यांना पडली चांगलीच महागात; मुख्यमंत्र्यांनी तातडीने पदावरुन हटवलं - chattisgarh chief minister bhupesh baghel remove collector from duty | Politics Marathi News - Sarkarnama

एक थप्पड जिल्हाधिकाऱ्यांना पडली चांगलीच महागात; मुख्यमंत्र्यांनी तातडीने पदावरुन हटवलं

वृत्तसंस्था
रविवार, 23 मे 2021

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. यात अनेक ठिकाणी नागरिकांवर बळाचा वापर केला जात आहे. 
 

रायपूर : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. संचारबंदी असताना लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणाचा मोबाईलही जिल्हाधिकाऱ्यांनी संतापून रस्तावर आपटल्याचे दिसत आहे. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांना अखेर महागात पडले असून, त्यांना पदावरुन तातडीने हटवले आहे. 

ही घटना छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.२२) घडली. जिल्ह्यात लॉकडाउन होती. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा हे रस्त्यावर उतरुन लॉकडाउनची पाहणी करीत होते. त्यावेळी लसीकरण करण्यासाठी एक तरुण दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिसांनी त्याला अडवले. त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी त्याने लसीकरण करण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले होते. 

हेही वाचा : संचारबंदीत घराबाहेर भाजी विकणाऱ्या मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू  

त्या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची कागदपत्रे आणि मोबाईलवरील इतर कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या कानाखाली लगावून त्याचा मोबाईळ रस्त्यावर आपटला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, असा आदेशही पोलिसांना दिला होता. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. जिल्हाधिकारीच कायदा हातात घेऊ लागले तर इतरांनी काय करायचे, असा सवाल नेटिझन सोशल मीडियावर विचारू लागले आहेत. 

याची गंभीर दखल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली आहे. त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पदावरुन हटवले आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, सूरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचे प्रकरण सोशल मीडियावरुन मला समजले. हे अतिशय दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कदापी खपवून घेतले जाणार नाही. तातडीने जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना पदावरुन हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख