मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीत गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून त्यांच्याविरुद्ध मोक्काअन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.
एनआयएच्या कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेने शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनीही १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत. पाटील म्हणाले की, परमबीरसिंह, वाझे या पोलीस अधिकाऱ्यांकडून समोर येत असलेली माहिती धक्कादायक आहे.या बाबतचे सबळ पुरावे सादर झाल्यास संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल व्हावेत. सामान्य माणसाला जो न्याय तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. वाझे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याऐवजी मंत्री अनिल परब यांनी एनआयए, सीबीआयसमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे.
कोरोना स्थिती हाताळण्यात राज्यातील आघाडी सरकारला अपयश आले आहे. लसीकरण कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. केंद्राकडून दिल्या गेलेल्या लशींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातून राज्याचा खोटेपणा उघड होत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राहुल नार्वेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संदीप लेले उपस्थित होते. ,असेही मा.पाटील म्हणाले.
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा आरोप वाझे यांनी केला आहे.
दरम्यान, अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असे काम करायला सांगितले नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटरबॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले आहे.

