वाझे प्रकरणात अजितदादांना अडकवण्यासाठी भाजपने टाकले फासे! - chandrakant patil demands cbi inquiry against ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

वाझे प्रकरणात अजितदादांना अडकवण्यासाठी भाजपने टाकले फासे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच पत्र लिहून अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) यांनाच पत्र लिहून दोघांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातून भाजपकडून अजित पवारांना घेरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे समोर येऊ लागले आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत पाटील यांनी अमित शहांना पत्र लिहिले आहे. यामुळे सीबीआय चौकशीचा चेंडू थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.  यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने न्यायालयात लेखी जबाब दिला आहे. यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी दर्शन घोडावत याच्या माध्यमातून वाझेकडे 100 कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे बेकायदा गुटखा विक्रेते आणि उत्पादक यांच्याकडून गोळा करण्यास वाझेंना सांगण्यात आले होते. 

याचबरोबर वाझे याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. निनावी तक्रारीच्या आधारे परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून पैसे गोळा करण्यास वाझेला सांगितले होते. महापालिकेच्या 50 उपकंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी असे 100 कोटी रुपये गोळा करण्यास परब यांनी वाझेला सांगितले होते, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा : अजितदादांच्या सीबीआय चौकशीचा चेंडू थेट अमितभाईंच्या कोर्टात 

भाजपच्या मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव करण्यात आला होता. भाजपने अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केल्याचे हे निदर्शक होते. अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने आता जाणीवपूर्वक लावून धरली आहे. पहाटेच्या शपथविधी प्रकरणानंतर भाजपने अजित पवारांना लक्ष्य करणे टाळले होते. आता भाजपने पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. 

केंद्रीय तपास संस्था कशा छळ करतात, हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लिहून कळविले आहे. अजित पवार यांच्यामागेही केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. अजित पवारांबद्दल असलेली भाजपची सहानुभूती संपल्याचे कार्यकारिणीच्या ठरावातून  स्पष्ट झाले आहे. भाजपसाठी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हेच मोठे लक्ष्य आहे. यात आता अजित पवारांचीही भर पडणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख