चंद्रकांतदादा म्हणतात, जनता भोळी जरूर आहे, पण... 

देवेंद्र फडणवीस यांनी पाच मार्चला विधानसभेत इम्पिरिकल डाटासंदर्भात सूचना करूनसुद्धा या सरकारने वेळकाढूपणा केला, असं पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकांतदादा म्हणतात, जनता भोळी जरूर आहे, पण... 
Chandrakant Patil criticizes State Government over OBC reservation

मुंबई : ओबीसी समाज बांधवांसोबत विश्वासघात करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपाने राज्यभरात प्रखर आंदोलन सुरू केले आहे. आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसी समाजानेच आता या सरकारला दणका द्यायला हवा. जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil criticizes State Government over OBC reservation)

आपल्याला आता भाषण बंद आणि संघर्ष सुरू करावा लागणार असल्याचे सांगत पाटील म्हणाले, फडणवीस सरकारने दिलेले 27 टक्के आरक्षण या सरकारनं समाप्त केलं. वारंवार या सरकारनं ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यभर आमचा संघर्ष सुरुच राहणार आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ज्या ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार नाहीत, असं जाहीर केलं होतं, आता तेच सरकार ओबीसी आरक्षण नसताना निवडणुका घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाच मार्चला विधानसभेत इम्पिरिकल डाटासंदर्भात सूचना करूनसुद्धा या सरकारने वेळकाढूपणा केला, असं पाटील यांनी सांगितलं.

सरकारमधील नेते नाना पटोले हे आज इम्पिरिकल डेटासंदर्भात मोदी सरकारकडे बोट दाखवत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मधल्या काळात पटोले यांनीच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात वकील देत नाही, असा आरोप केला होता, याचा बहुदा त्यांना विसर पडला असावा, याकडं पाटील यांनी लक्ष वेधलं.

भाजपा महाराष्ट्र वेळोवेळी ओबीसी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. भाजपाने ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आणि आजही संघर्ष करत आहे. परंतु आपलं खोटं बाहेर पडेल या भीतीने भाजपाचे आजचे ओबीसी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे. शेवटी सत्य कितीही झाकले तरी ते बाहेर पडणारच! महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकले आहे. ‘जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही !’ हे सरकारने लक्षात ठेवावं, असं पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in