भाजप सोडताच माजी केंद्रीय मंत्र्याला दणका; काही तासांतच झेड सुरक्षा कमी

माजी केंद्रीय मंत्र्यांनी आज भाजपला धक्का देत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीआधीच त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
central governments reduces security cover of babul supriyo
central governments reduces security cover of babul supriyo

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी आज भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली आहे. तृणमूलच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी सुप्रियोंना स्टार प्रचारक नेमले होते. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीआधीच त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. 

सुप्रियो यांनी आज तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले आहेत. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला आहे.  

यानंतर काही तासांतच बाबुल सुप्रियो यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यांना आधी झेड दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुप्रियो यांच्या सुरक्षेसाठी आधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सहा ते सात कमांडो होते. आता त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन सशस्त्र कर्मचारी असतील. सुप्रियो यांना आता देण्यात आलेली वाय सुरक्षाही संपूर्णपणे काढली जाऊ शकते. त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे पश्चिम बंगाल पोलिसांवर टाकली जाऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच,  खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते. 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उतरले होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. आता राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. भवानीपूर या ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचासाठी ही निर्णायक निवडणूक आहे. भाजपनेही ममतांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com