मोदी सरकारचा मोठा निर्णय : राज्यांना अतिरिक्त 15 हजार कोटींचे वित्तीय साहाय्य देणार - central government will give 15 thousand crore for capital expenditure to states | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारचा मोठा निर्णय : राज्यांना अतिरिक्त 15 हजार कोटींचे वित्तीय साहाय्य देणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशातील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला असून, राज्यांच्या अर्थकारणावरही परिणाम झाला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, त्याचा फटका राज्यांच्या अर्थकारणाला बसत आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अतिरिक्त 15 हजार कोटी रुपये भांडवली खर्चासाठी देण्याची घोषणा केली आहे. हा निधी राज्यांना 50 वर्षांसाठी बिनव्याजी दिला जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या खर्च विभागाने याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यांना भांडवली खर्चासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यातून राज्ये रोजगारनिर्मिती करु शकतील. विशेषत: गरीब आणि अकुशल व्यक्तींना रोजगार दिल्यास अर्थव्यवस्थेच्या उभारीला बळ मिळेल. यातून अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वाढेल. 

केंद्र सरकारची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसली तर राज्यांना भांडवली खर्चासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय मागील वर्षीच घेण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या या नव्या योजनेनुसार, राज्यांना वित्तीय साहाय्य मिळणार आहे. ते 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्जाच्या रुपाने मिळेल. मागील आर्थिक वर्षात यासाठी 12 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील 11 हजार 830 कोटी वितरीत करण्यात आले होते. 

अशी मिळणार मदत 
पहिला भाग :
 ईशान्येतील आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांनी प्रत्येकी 400 कोटी तर उरलेल्या राज्यांना प्रत्येकी 200 कोटी 
दुसरा भाग : केंद्रीय करातील राज्यांच्या हिश्श्यानुसार सर्व राज्यांना मिळून 7 हजार 400 कोटी रुपये 
तिसरा भाग : पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे  निर्गुंतवणुकीकरण करणाऱ्या राज्यांसाठी 5 हजार कोटी रुपये 

देशात दर तासाला 145 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 
देशात आता दरतासाला सुमारे 145 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 86 हजार 452 रुग्ण सापडले असून, 3 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 हजार 498 मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्र 771, दिल्ली 395, उत्तर प्रदेश 295, कर्नाटक 270, छत्तीसगड 251, गुजरात 180, राजस्थान 158, झारखंड 145, पंजाब 137 आणि तमिळनाडूतील 107 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख