मोदी सरकारचा सिरमला मोठा झटका..लशीच्या चाचणीस परवानगी नाकारली - central government denies approval for trial of covovax for children to SII | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोदी सरकारचा सिरमला मोठा झटका..लशीच्या चाचणीस परवानगी नाकारली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन करीत आहे. 

नवी दिल्ली : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे (Covovax) उत्पादन करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनला (Covaxin) मागे टाकले आहे. या लशीची चाचणी लहान मुलांवर करण्यासाठी सिरमला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे.  

कोव्होव्हॅक्स लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. सिरमकडून नोव्होव्हॅक्सच्या लशीची मुलांसाठी जुलैपासून चाचणी सुरू होणार होती. त्यामुळे लहान मुलांसाठी सिरमची कोरोना लस लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. प्रौढांसाठी ही लस 90 टक्के प्रभावी आढळली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्होव्हॅक्स लशीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 2 ते 17 वयोगटातील मुलांवर करण्यास औषध महानियंत्रकांच्या समितीने सिरमला परवानगी नाकारली आहे. सिरमने कोव्होव्हॅक्स लशीची चाचणी 12 ते 17 वयोगटातील 460 मुलांवर आणि 2 ते 11 वयोगटातील 460 मुलांवर करण्याची परवानगी सिरमने मागितली होती. दहा ठिकाणी या चाचण्या होणार होत्या. लहान मुलांसाठी या लशीला अद्याप कोणत्याही देशाने परवानगी दिली नसल्याचे कारण समितीने दिले आहे. 

कोव्होव्हॅक्सच्या चाचण्या प्रौढांवर सुरू असून, त्याचा डेटा कंपनीने आधी सादर करावा. त्यानंतर लहान मुलांवरील चाचण्यांबाबत विचार करता येईल, असेही समितीन म्हटले आहे. समितीने केलेल्या या शिफारशी औषध महानियंत्रकांनी स्वीकारल्या आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. कोव्होव्हॅक्स लशीच्या भारतातील पौढांसाठीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सिरमकडून ही लस सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होईल. 

हेही वाचा : सहा महिन्यांत एलपीजी सिलिंडर 140 रुपयांनी महागला अन् स्मृती इराणी पुन्हा चर्चेत 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सिरमसोबत नोव्होव्हॅक्स कंपनीने कोव्होव्हॅक्स लशीच्या उत्पादनासाठी करार केला होता. या लशीच्या भारतातील चाचण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. भारतात लशीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्या तरी जागतिक पातळीवर झालेल्या चाचण्यांच्या आधारे या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करता येतो, अशी माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी दिली होती. 

या लशीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत 90.4 टक्के आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना यांच्या कोरोना लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतील परिणामकारकता अनुक्रमे 91.3 टक्के आणि 90 टक्के आहे. याचवेळी कोव्हिशिल्डची परिणामकारकता 76 टक्के (अमेरिकेतील चाचण्या) आणि कोव्हॅक्सिनची परिणामकारकता 81 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख