मोदी अन् योगींशी पंगा घेणं ओवेसींना पडलं महागात

पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना चांगलंच महागात पडलं आहे.
case registered against asaduddin owaisi by uttar pradesh police
case registered against asaduddin owaisi by uttar pradesh police

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका करणे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना चांगलंच महागात पडलं आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे, जातीय सलोखा बिघडविणे, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओवेसी हे तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यात ओवेसी यांचा पक्ष सुमारे 100 जागा लढवणार आहे. एमआयएमने काल (ता.9) रॅली काढली होती. या रॅलीत ओवेसी सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा उद्‌ध्वस्त करून हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, आरोप ओवेसी यांनी केला होता.

कटरा चंदना येथे आयोजित केलेल्या एमआयएमच्या रॅलीत मोठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे, ओवेसी यांनी मास्क घातला नव्हता तसेच, सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही, अशी माहिती बाराबंकीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. पक्षाच्या रॅलीनंतर उत्तर प्रदेशातील बाराबंकी पोलीस ठाण्यात काल रात्री ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सुमारे १०० वर्षांपूर्वीची राम सनेही घाट मशीद प्रशासनाने उद्‌ध्वस्त केली. तसेच, मशिदीचा ढिगाराही तेथून हलवला, असे वक्तव्य ओवेसी यांनी केले होते. ते वस्तुस्थितीच्या विपरित आहे. ही मशीद बाराबंकीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर होती. ही मशीद बेकायदा असल्याने उपविभागीय दंडाधिकारी आदर्श सिंह यांच्या आदेशानुसार ती पाडण्यात आली, असा खुलासाही पोलीस अधीक्षकांनी केला आहे. 

ओवेसी यांनी दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि निराधार वक्तव्ये केली, असेही पोलिसांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले होते ओवेसी? 
ओवेसी म्हणाले होते की, तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल भाजप नेते वारंवार बोलत असतात. परंतु, पुरुषांनी टाकून दिलेल्या हिंदू महिलांबद्दल भाजप नेते मौन धारण करतात. माझी भाभी (मोदींच्या पत्नी) गुजरातमध्ये एकट्या राहत आहेत. परंतु, त्यांच्या प्रश्नावर कुणीच काही बोलताना दिसत नाही. 

ओवेसींनी भाजपसोबत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसवरही निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, संपूर्ण देशातील धर्मनिरपेक्षतेला कमकुवत करण्यात भाजप गुंतली आहे. त्याचवेळी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस या पक्षांनी गप्प बसणे पसंत केले आहे. अल्पसंख्याकांच्या हिताबद्दल हे पक्ष काहीही बोलत नाहीत. या पक्षांनी मुसलमानांची मते घेतली पण त्यांच्यासाठी काही केले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com