मुख्यमंत्री ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी - caller from dubai threatens to target cm uddhav thackerays residence matoshri | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

मातोश्री निवासस्थानी धमकीचे कॉल येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे मातोश्री परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कॉल दुबईतून आल्याचे समोर आले असून, हे कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाने केल्याचे समजते. यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या असून, मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर या कॉलची शहानिशाही करण्यात येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे कॉल करणाऱ्या व्यक्तीने मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दिलेली आहे. हे कॉल दुबईतून आले असून, त्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. मातोश्रीतील दूरध्वनीवर आज तीन ते चार कॉल आले. दाऊदच्या गँगचा मेंबर असल्याचे सांगून मातोश्रीवर हल्ला करु, असेही कॉल करणारा व्यक्ती म्हणाला. त्याने मातोश्री बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मातोश्रीवरील सुऱक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. 

कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. कॉल हा दुबईतूनच आला होता का याची शहानिशा पोलीस करीत आहेत. यासोबत कॉल करणारा व्यक्ती दाऊद गँगचा मेंबर आहे का, याचीही तपासणी पोलीस करीत आहेत. मातोश्रीवरील बंदोबस्तातही मोठी वाढ करण्यात आली आहे. 

याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोलून मी माहिती घेत आहे. मी पहिला शिवसैनिक आणि नंतर गृहराज्यमंत्री आहे. त्यामुळे मातोश्री हे आम्हा शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. ते आमचे श्रद्धास्थान आहे. मातोश्रीवर फोन करुन धमकी देणारा जन्माला यायचा आहे. 

याविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मातोश्रीवर अशा अनेक धमक्या आधीही आली आहे. मातोश्रीसमोर शिवसैनिकांची अभेद्य भिंत आहे. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस हे आमचे रक्षणकर्ता आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा ऐऱ्यागैऱ्याच्या धमकीला मातोश्री घाबरत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख