राजस्थानच्या राज्यपालांनीच आता घटनात्मक जबाबदारी पार पाडावी... - bsp supremo mayawati slams rajasthan government and congress party | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानच्या राज्यपालांनीच आता घटनात्मक जबाबदारी पार पाडावी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर शमले आहे. यामुळे राज्यातील गेहलोत सरकार पुन्हा एकदा स्थिर झाले आहे. मात्र, पायलट आणि गेहलोत यांच्या मनोमिलनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. राज्यातील या घडामोडींवरुन बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची 9 ऑगस्टला भेट घेतली होती. यानंतर 10 ऑगस्टला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्याच्या वाटेवर आहेत.

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतू लागले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली आहे. यामुळे काही बंडखोर आमदार हे गेहलोत यांना भेटले आहेत. त्यांनी गेहलोत सरकारला पाठिंबाही दर्शविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गेहलोत आणि पायलट यांचे पुन्हा मनोमिलन होत असून, या मुद्द्यावरुन मायावती यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजस्थानमधील काँग्रेस सरकार आता स्थिर दिसत आहे. मात्र, पायलट आणि गेहलोत यांच्यातील नाटक पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. या दोन नेत्यांमधील संघर्षामुळे जनतेच्या कल्याणाची कामे ठप्प झाली आहेत. त्यांच्या दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्षाचा राज्याला मोठा फटका बसत आहे. 

कोरोनाचा कहर वाढत असताना सरकारने जनतेवर लक्ष द्यायला हवे, असा टोलाही मायावती यांनी लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकार कोरोना संकटाच्या काळात जनतेकडे लक्ष देण्याऐवजी इतर बाबींकडे लक्ष देत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार पुरेसे गंभीर नाही, असे मला वाटते. सरकारच्या दुर्लक्षामुळे जनकल्याणाची कामे खोळंबली आहेत. भविष्यातही असे प्रकार होण्याची शक्यता आहे. यामुळे राजस्थानच्या राज्यपालांनीच आता घटनात्मक जबाबदारी पार पाडायला हवी. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख