दावूद बाबत रोहित पवारांनी केली 'ही' मागणी  - Bring Dawood Ibrahim Back to India Demands NCP Mla Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

दावूद बाबत रोहित पवारांनी केली 'ही' मागणी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 ऑगस्ट 2020

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचा भारताने जागतिक पातळीवर सातत्याने केलेला दावा अखेर खरा ठरला आहे.  दाऊद पाकिस्तानात असल्याचे त्या देशाने कबूल केले आहे. आता कुठल्याही परिस्थितीत दाऊदला भारतात आणावे, अशी विनंती रोहित पवार यांनी पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये केली आहे

पुणे :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याची चर्चा वारंवार सुरू असते. नेहमी पाकिस्तानकडून त्याच इन्कार केला जातो. मात्र, खुद्द पाकिस्तानने दाऊद त्यांच्याकडेच असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दाऊदला तातडीने भारतात आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांना केली आहे.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचा भारताने जागतिक पातळीवर सातत्याने केलेला दावा अखेर खरा ठरला आहे.  दाऊद पाकिस्तानात असल्याचे त्या देशाने कबूल केले आहे. आता कुठल्याही परिस्थितीत दाऊदला भारतात आणावे, अशी विनंती रोहित पवार यांनी पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये केली आहे. 

दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यात येत आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत मागील काही काळात कमी करण्यात आली आहे. याचबरोबर ही मदत रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याची मोहीम सुरू आहे.  पॅरिसस्थित फायनान्शियल टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला जून २०११ मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. याचबरोबर २०१९ च्या अखेरपर्यंत दहशतवाद्यांवरील कारवाईचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले होते. कोरोनाच्या महामारीमुळे ही मुदत नंतर वाढविण्यात आली होती. 

८८ गटांवर पाकिस्तानने आणले निर्बंध

पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्याने अखेर पाकिस्तानने देशातील ८८ दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध लादले आहेत. यात हाफीज सईद, मसूज अजहर आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. या निर्बंधानुसार दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांची सर्व मालमत्ता आणि बँक खाती गोठविण्यात येणार आहे. 

पाकिस्तान सरकारने १८ ऑगस्टला दोन अधिसूचना काढल्या आहेत. यात ८८ दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यात मुंबईवरील २६-११ हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद, जैशे महंदमचा प्रमुख मसूद अजहर आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या समावेश आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख