...तरच सीबीआय पथकाला क्वारंटाईनमधून सवलत; मुंबई महापालिकेचा इशारा - Brihanmumbai Municipal Corporation clarifies about cbi team quarantine | Politics Marathi News - Sarkarnama

...तरच सीबीआय पथकाला क्वारंटाईनमधून सवलत; मुंबई महापालिकेचा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून उठलेला गदारोळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अखेर संपला आहे. आता मुंबई महापालिकेने तपासासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआय पथकाला आधीच सूचना केली आहे.  

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. याबाबत सर्व सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या तपासावरुन मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला गदारोळ अखेर संपला आहे. या प्रकरणी तपासासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआयच्या तपास पथकाला मुंबई महापालिकेने आधीच क्वारंटाईनबाबत इशारा दिला आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई महापालिकेने याआधी सुशांतप्रकरणी तपासासाठी बिहारमधून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. आता सुशांतप्रकरणी तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सीबीआयचे पथक लवकरच चौकशीसाठी मुंबईत दाखल होत आहे. 

या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, सीबीआयचे पथक सात दिवसांसाठी आले तर त्यांना क्वारंटाईनमधून आपोआप सवलत मिळेल. ते सात दिवसांपेक्षा अधिक काळासाठी आल्यास त्यांना क्वारंटाईनमधून सवलत मिळावी यासाठी आमच्या ई-मेल आयडीवर ई-मेल करावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांना क्वारंटाईनमधून सवलत देण्याचा निर्णय घेऊ. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख