शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोट्यवधी अन् भाजपला वाटाण्याच्या अक्षता - bmc allocates very few fund for bjp corporators says bjp leader | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोट्यवधी अन् भाजपला वाटाण्याच्या अक्षता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

महापौरस्तरावर झालेल्या महापालिकेच्या निधीवाटपात भाजपला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. याचवेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना भरभरून निधी मिळाला आहे.
 

मुंबई : महापालिकेत महापौरस्तरावर झालेल्या निधीवाटपात पुन्हा एकदा भाजपला डावलण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पामध्ये फेरफार करून १९० कोटी रुपयांचा निधी राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आला. त्यात भाजपच्या वाट्याला केवळ वाटाण्याच्या अक्षता आल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पामध्ये फेरफार करून १९० कोटी रुपयांचा नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील १६३ कोटी रुपयांचा निधी शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. महापालिकेत शिवसेनेचे ९७ नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजपचे ८३ नगरसेवक असतानाही त्यांना काहीच निधी दिलेला नाही, असा आरोप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. 

महापालिकेत २९ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला ९ कोटी रुपये, राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कोटी रुपये आणि समाजवादी पक्षाला ४ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असा आरोप भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी केला. 

याआधी स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर करताना नगरसेवकांसाठी ६५० कोटी रुपयांची फेरफार करण्यात आला. तेव्हाही शिवसेनेला ३४० कोटी रुपये आणि काँग्रेसला ११० कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यावेळी भाजपला केवळ १४३ कोटी रुपये मिळाले होते. हा भाजपच्या नगरसेवकांवरील अन्याय नसून, हे नगरसेवक प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागातील मतदार आणि नागरिकांवरील अन्याय आहे. भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकास रोखण्याचे काम केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

विषय समित्यांत महाविकास आघाडीची परीक्षा 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिवसेना आणि काँग्रेस या दोन घटक पक्षांची परीक्षा आता मुंबई महापालिकेत होणार आहे. महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार आहे. सहा महिन्यांपूर्वीप्रमाणे काँग्रेस आयत्या वेळी उमेदवारी मागे घेणार की शिवसेनेला अडचणीत आणणार, याकडे आता लक्ष लागले आहे. काँग्रेस आघाडी धर्म पाळणार की नाही, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे. 

महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळाचा विचार करता शिवसेनेचा विजय निश्‍चित मानला जात आहे; मात्र काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपच्या सदस्यांनी ऐनवेळी कॉँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्यास शिवसेनेला धक्का बसू शकतो. त्यामुळे कॉँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख