भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालयावरच हल्लाबोल - bjp workers attack party office raise slogans in malda west bangal | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालयावरच हल्लाबोल

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपावरुन भाजमपधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे नाराज कार्यकर्ते पक्ष कार्यालय आणि नेत्यांना लक्ष्य करु लागले आहेत.   

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपावरुन भाजपमध्ये अंतर्गत दुफळी समोर आलेली असताना पक्षाने 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. आता यावरुन पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. यासाठी भाजपने जोर लावलेला असताना पक्षासमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. तिकिट वाटपावरुन नाराज झालेले कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवू लागले आहेत. पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत पक्षात नसलेल्या नेत्यांचाही समावेश होता. यामुळे कार्यकर्ते आणखी संतप्त झाले आहेत. 

माल्डा येथे तिकिट वाटपावरुन  नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरच हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील टेबल, खुर्च्यांची मोडतोड करुन पक्षाची पोस्टर फाडून टाकली. याचबरोबर पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पक्षाने माल्डा येथील हरिश्चंद्रपूर आणि ओल्ड माल्डा या मतदारसंघात दिलेल्या दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा विरोध आहे. 

पक्षाची तिसरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयावरच हल्ले केल्याचे प्रकार आधीही घडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कोलकत्यातील पक्ष कार्यालयाबाहेरच भाजप कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे. 

भाजपने तिकिट दिलेल्या उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसमधील आयात उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोलकत्यातील भाजप कार्यालयाबाहेर तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. काही जागांवर पक्षाने दिलेले उमेदवार मान्य नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून दगडफेकीसह नेत्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते पक्षाच्या कोलकत्यातील कार्यालयाबाहेर आंदोलन करीत आहेत. नुकतीच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय, अर्जुनसिंह आणि शिव प्रकाश यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकत्यात आले होते. त्यावेळीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  याचबरोबर लोखंडी बॅरिकेडही कार्यालयाबाहेर उभे करण्यात आली आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख