भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर...स्टार प्रचारकांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनाच स्थान नाही - bjp star campaigner list does not include former chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर...स्टार प्रचारकांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनाच स्थान नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 एप्रिल 2021

भाजपने माजी मुख्यमंत्र्यालाच डावलल्याने पक्षातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. 

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याजागी मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत हे आले आहेत. सत्तारूढ भाजपच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे रावत यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता राज्यातील एका विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या यादीतून माजी मुख्यमंत्री असलेल्या त्रिवेंद्रसिंह रावत यांना वगळले. यावरुन पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

भाजपचे आमदार सुरेंद्रसिह जीना यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सॉल्ट विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजपने सुरेंद्रसिंह यांचे बंधू महेश जीना यांना मैदानात उतरवले आहे. याचवेळी काँग्रेसने गंगा पांचोली यांना उभे केले आहे. पांचोली यांनी मागील वेळी २०१७ मध्ये सुरेंद्रसिंह यांनी ३० हजार मतांना पराभूत केले होते. आता सरकारमध्ये फेरबदल होऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले तिरथसिंह रावत यांची ही परीक्षा ठरणार आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी ताकद लावली आहे. 

भाजपने या पोटनिवडणुकीसाठी ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे. मात्र, यादीत त्रिवेंद्रसिंह रावत यांचे नाव नाही. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपने माजी मुख्यमंत्र्यालाच डावलल्याने पक्षातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मागील महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली. पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंह रावतही अपवाद ठरले नाहीत. त्यांना राज्यातील अधुऱ्या कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता.  

रावत यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. पक्ष नेतृत्वाने निरीक्षक रमणसिंह व दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडमध्ये स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. त्यांनी भाजपच्या ४५ आमदारांशी चर्चा करून याबाबतचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केला होता. त्यानंतर रावत यांना बदलण्याच्या हालचालींना वेग आला होता. रावत यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक जिंकणे अशक्‍य असल्याचे आमदारांनी पक्षनेतृत्वाला थेट सांगितले होते. त्यानंतर तिरथसिंह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले होते.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख