भाजप, काही वृत्तवाहिन्या अन् सेलिब्रिटींकडून महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम : देशमुख - bjp some news channels and some celebrities defame maharashtra says anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप, काही वृत्तवाहिन्या अन् सेलिब्रिटींकडून महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम : देशमुख

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो फेक अकाउंट बनवण्यात आली होती. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत  मृत्यू प्रकरणाला काही प्रसारमाध्यमे आणि काही राजकीय पक्षांनी हेतुपुरस्सर वेगळे वळण दिल्याची बाब अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधनातून समोर आली आहे. याप्रकरणी भाजप, काही  वृत्तवाहिन्या आणि काही सेलिब्रिटींनी महाराष्ट्राची नाहक बदनामी केली असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही देशमुख यांनी लक्ष्य केले. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून होत आहे. त्याची हत्या झाली की आत्महत्या हे  लवकरच समोर येईल. याप्रकरणी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने 14 जून ते 12 सप्टेंबर या कालावधीत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या सर्व डेटाचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. भाजपने हे प्रकरण वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप आणि पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपने केले. तसेच, बाहेरच्या राज्यातील कठपुतळ्यांनाही आपल्या तालावर नाचवण्याचे काम भाजपने केले. मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणात योग्य प्रकारे तपास केल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले आहे. परंतु, पाच वर्ष महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व केलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचा तपास योग्य नव्हता, असे म्हणत मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. ही अतिशय खेदजनक बाब असल्याचे देशमुख यांनी सांगितले.  

सध्याच्या घडीला बिहार निवडणूक लढवत असलेले माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही महाराष्ट्राची बदनामी केली. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारचे भाजप प्रभारी आहेत. आता फडणवीस हे पांडेंच्या प्रचाराला बिहारलाही जाणार का, असा टोलाही देशमुख यांनी या वेळी लगावला. 

याविषयी बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग म्हणाले की, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ही मोहीम चालवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांचे मनोधैर्य कमी करण्यासाठी ही मोहीम चालवण्यात आली. कोविड-19 मुळे आमच्या 84 पोलिसांचा मृत्यू झाला असून, 6 हजारहून अधिक जणांना लागण झाली. अशा काळात मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम सुरू होते. 

मुंबई पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांची बदनामी करणे या उद्देशाने मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करण्यात आली होती. या प्रकरणी आमचा सायबर सेल तपास करीत आहे. यात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख